हिंदी महासागरात 10 पट वाढणार ‘हॉट डेज’
मालदीव समवेत 40 देशांसाठी वाढतोय धोका
हिंदी महासागर सातत्याने अन् जलदपणे उष्ण होत चालला आहे. पूर्वी हिंदी महासागरात अत्याधिक उष्णतेचे दरवर्षी 20 दिवस असायचे, परंतु अत्यंत लवकरच हे प्रमाण 10 पटीने वाढणार आहे. हे प्रमाण 220 ते 250 दिवस प्रतिवर्ष होणार आहे. म्हणजेच हिंदी महासागर स्थायी स्वरुपात सागरी हिटवेव्हचा शिकार ठरणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
या हिटवेव्हमुळे मालदीवसारख्या 40 देशांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यात भारतासमवेत अनेक आशियाई देश सामील आहेत. यामुळे तीव्र हवामान आपत्ती वाढतील, म्हणजेच अवकाळी पाऊस पडू शकतो, तीव्र वादळे येऊ शकतात आणि मोठा पूर येण्याची शक्यता आहे. याचबरोबर सागरी पर्यावरणीय व्यवस्था बिघडणार आहे. कोरल रीफ बिघडतील.
हिंदी महासागरातील वाढत्या तापमानावरून भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेचे वैज्ञानिक रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी स्वत:च्या टीमसोबत अध्ययन केले आहे. या अध्ययनात हिंदी महासागरात हवामान बदलातील जलदपणा दाखविण्यात आला आहे. यात पुरेशी उष्णता, सागरी पातळीत वृद्धी आणि तीव्र हवामान आपत्तींची शक्यता असल्याचे म्हटले गेले आहे.
40 देशांसमोर मोठे संकट
हिंदी महासागराला 40 देशांची सीमा लागते, या देशांमध्ये जगातील एक तृतीयांश लोकसंख्येचे वास्तव्य आहे. हिंदी महासागराचे सरासरी तापमान 1.2 ते 3.8 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अनुमान आहे. हे तापमान एका शतकात वाढणार आहे. हिंदी महासागराचे तापमान वाढल्याने आसपासच्या देशांमध्ये अतिवृष्टी आणि चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढणार आहे.
हिटवेव्हच्या दिशेने वाटचाल
हिंदी महासागर जवळपास स्थायी सागरी हिटवेव्हच्या दिशेने सरकत आहे. यामुळे हिटवेव्हच्या दिवसांची संख्या वार्षिक 20 वरून 250 पर्यंत वाढू शकते. सागरी पीएच पातळीत घट झाल्याने पाणी अॅसिडिक होत चालले आहे, यामुळे कॅल्सिफिकेशन वाढत असल्याने कोरल रीफ्स आणि सागरी जीवसृष्टीला मोठे नुकसान पोहोचणार आहे.
त्वरित पावले उचलण्याची गरज
जागतिक तापमानवाढ वेगाने कमी करावे लागणार आहे, तसेच कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल. लवचिक पायाभूत सुविधा, शाश्वत सागरी अभ्यास, अत्याधुनिक पूर्वानुमान, अनुकूल कृषी अणि हिंदी महासागर क्षेत्रावर हवामान बदलाचे कठोर प्रभाव कमी करण्यासाटी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने लक्ष द्यावे लागणार असल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे.
या ठिकाणांना जोखीम
जगातील या क्षेत्रात हवामान बदलामुळे आसपासच्या देशांमध्ये मोठ्या स्तरावर सामाजिक आणि आर्थिक प्रभाव पडतो. पूर्ण जगात हिंदी महासागर जागतिक तापमानवाढीचा सर्वात मोठा शिकार ठरत आहे. यामुळे किनारी हवामानात बदल घडून येणार आहे. तीव्र हवामान आपत्ती येतील. तीव्र उष्णता अरबी समुद्रासमवेत उत्तरपश्चिम हिंदी महासागरात आहे. दक्षिणपूर्व हिंदी महासागरात सुमात्रा आ0िण जावा किनाऱ्यांवर तुलनेत कमी उष्णता आहे. सागरी पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने ऋतुचक्रात बदल होईल. 1980-2020 दरम्यान हिंदी महासागरात कमाल बेसिन-सरासरी तापमान पूर्ण वर्ष 28 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंत किमान तापमान जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा अधिक राहणार आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत तापमान अशाचप्रकारे राहिल्यास चक्रीवादळांच्या संख्येवर प्रभाव पडणार आहे.
खोल भागातही उष्णता वाढतेय
हिंदी महासागरात वेगाने वाढणारी उष्णता केवळ पृष्ठभागापुरती मर्यादित नाही. पृष्ठभागापासून 2000 मीटरच्या खोलवर हिंदी महासागरात उष्णता 4.5 जेटा-जूल प्रति दशकाच्या दराने वाढत आहे. भविष्यात हे 16-22 जेटा-जूल प्रतिदशकाच्या दराने वाढू शकते. ज्याप्रकारे उष्णता वाढतेय, ते हिरोशिमा-नागासाकी आण्विक विस्फोटातून बाहेर पडलेल्या ऊर्जेइतकी राहिली आहे. म्हणजेच एका दशकात इतके तापमान वाढणार आहे. यामुळे सागरी पातळी वेगाने वाढतील. अनेक बेट आणि किनारे समुद्रात सामावले जातील असे रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले.
मान्सून बिघडणार
हिंदी महासागरात एक इंडियन ओशन डायपोल सिस्टीम चालते, ही एक नैसर्गिक घटना असून याचा प्रभाव मान्सून आणि चक्रीवादळांच्या निर्मितीवर पडतो. 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंत डायपोल सिस्टीम टोकाला पोहोचेल. याची तीव्रता 66 टक्क्यांनी वाढण्याचा अनुमान आहे. मध्यम स्तराच्या घटना 52 टक्क्यांनी वाढू शकतात. उष्णकटिबंधीय हिंदी महासागरात स्थायी स्वरुपात उष्णतेच्या लाटा येऊ लागती. सागरी उष्णतेच्या लाटा कोरल रीफ्स, सागरी गवत, केल्पच्या जंगलांना नष्ट करतील. यामुळे मस्त्यपालनावर प्रतिकूल प्रभाव पडणार आहे. सागरी उत्पादकता सातत्याने कमी होत आहे. पृष्ठभागीय क्लोरोफिलमध्येही घट झाली आहे.