दिवसभर उकाडा, रात्री गारवा...
कोल्हापूर :
मागील आठवड्यात थंडीचा कडाका वाढला होता. किमान तापमान 13 अंश डिग्रीसेल्सिअस पर्यंत घसरल्याने हुडहुडी चांगलीच वाढली होती. मंगळवारी, मात्र किमान तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचल्याने वातवरणात थंडीची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला असुन. दिवसभर ढगाळ वातावरणासह उकाडा जाणवत आहे.
दिवसभर उकाडा असला तरी रात्री हवेत गारवा जाणवत आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे थंडीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी पहाटे काही भागात धुक्याची दुलई पसरली होती. सकाळी आठ वाजेपर्यंत हवेत किंचीत गारठा जाणवत होता. मात्र, काहीअंशी थंडीचा कडाका कमी झाला असल्याचा अनुभव नागरिकांना मिळाला. यानंतर सूर्याचे दर्शन झाले. दुपारी 12 वाजल्यानंतर मात्र, ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ढगाळ वातावरण असले तरी हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळपर्यंत अशीच स्थिती होती. सायंकाळनंतर मात्र, वातावरणात किंचित गारवा जाणवू लागला. रात्री गारठा कायम राहील्याची स्थिती होती.
मंगळवारी किमान तापमानाची 19 अंश डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस इतकी नेंद करण्यात आली. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडीचा कडाका कमी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे शीत वाऱ्याची तीव्रता कमी होत आहे. त्यातच ढगाळ वातवरणामुळे तापमान वाढत असुन जिल्ह्यासह राज्यातील थंडीचा जोर कमी होत आहे.
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी गारपीठ निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संमिश्रणामुळे सांद्रिभवन क्रिया होऊन पुढील काही दिवसात पावसाचा पडण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज असल्याचे भूगोल व पर्यावरण तज्ञ डॉ. युवराज मोटे यांनी सांगितले.