यजमान भारताला विक्रमी 22 पदके
विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा : ब्राझील पदकतक्त्यात अग्रस्थानी, चीनला दुसरे, इराणला तिसरे स्थान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच येथे झालेल्या 2025 च्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत यजमान भारताने दर्जेदार कामगिरी करताना विक्रमी 22 पदकांची लयलुट केली. भारताने या स्पर्धेत 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदके मिळविली. पदकतक्त्यात भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले,. ब्राझीलने 15 सुवर्ण, 20 रौप्य आणि 9 कांस्यपदकासह एकूण 44 पदके मिळवित अग्रस्थान पटकाविले तर चीनने 13 सुवर्ण, 22 रौप्य आणि 17 कांस्यपदकांसह एकूण 52 पदकांसह दुसरे तर इराणने 9 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 16 पदके घेत तिसरे स्थान मिळविले.
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय अॅथलिट्सनी 3 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदके मिळविली. सिमरन शर्मा, प्रिती पाल आणि नवदीप यांनी प्रत्येकी 1 रौप्य पदक पटकाविले. महिलांच्या टी-12 गटातील 200 मी. धावण्याच्या शर्यतीत उत्तरप्रदेशची 25 वर्षीय महिला धावपटू सिमरन शर्माने 24.46 सेकंदांसह दुसरे स्थान मिळवित रौप्य पदक घेतले. या शर्यतीमध्ये सुरूवातीला सिमरन तिसऱ्या स्थानावर फेकली गेली होती. पण व्हेनेझुएलाची धावपटू अॅलेजेंड्रा पेरेझ लोपेझ हिला अपात्र ठरविण्यात आल्याने सिमरनला दुसरे स्थान मिळाले आणि ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. सिमरनचे विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. 2024 साली कोबे येथे झालेल्या या स्पर्धेत सिमरनने महिलांच्या टी-12 गटातील 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच तिने गेल्या शुक्रवारी या स्पर्धेत महिलांच्या टी-12 गटातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.
महिलांच्या टी-35 गटातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या 25 वर्षीय प्रिती पालने रौप्य पदक पकटाविले. तिने 14.33 सेकंदांचा अवधी घेतला. चीनच्या कियानकियानने 14.24 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील प्रीती पालचे हे दुसरे पदक आहे. तिने महिलांच्या टी-35 गटातील 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक यापूर्वी मिळविले होते.
पुरूषांच्या एफ-41 गटातील भालाफेक प्रकारात भारताच्या नवदीप सिंगने 45.46 मी.ची नोंद करत रौप्य पदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात इराणच्या सादेग सेयाने 48.86 मी.ची नोंद करत सुवर्णपदक मिळविले. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत नवदीप सिंगने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरूषांच्या टी-44 गटातील 200 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या संदीपने 23.60 सेकंदांचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.