वसतिगृह विद्यार्थ्यांनी सरकारी सुविधांचा लाभ घ्यावा
मागासवर्गीय कल्याण अधिकारी शिवप्रिया कडेचूर यांचे आवाहन
बेळगाव : मागासवर्गीय कल्याण खात्याच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सरकारकडून दर्जेदार आहार, सुसज्ज ग्रंथालय, संगणक व्यवस्था यासह स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके, अत्युत्तम सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मागासवर्गीय कल्याण खात्याच्या जिल्हा अधिकारी शिवप्रिया कडेचूर यांनी विद्यार्थ्यांना केले. मच्छे येथील मागासवर्गीय कल्याण खात्याच्या विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वसतिगृहांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेणे आवश्यक आहे. मॅट्रिकपूर्व विद्यार्थी वसतिगृहांमध्ये सुसज्ज ग्रंथालय, संगणक, लॅब, स्टडी हॉल आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना नाईट ड्रेस, ट्रॅकसूटही देण्यात येत आहेत. यावेळी अधिकारी शिवप्रिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. भविष्यातील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी केली पाहिजे. मिळालेल्या वेळेचा व सुविधेचा लाभ घेऊन स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून यशस्वी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वसतिगृहामध्ये येणाऱ्या वृत्तपत्र, नियतकालिक, स्पर्धा पुस्तके याबाबतची माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवण व्यवस्थेचीही पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.