हुबळी येथील हॉस्पिटल सार्वजनिकांसाठी लवकरच समर्पित
डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती : जागतिक हृदय दिनानिमित्त कार्यक्रम
बेळगाव : केएलई संस्थेच्या माध्यमातून नेहमीच परवडणाऱ्या दरात रुग्णांवर उपचार देण्यासाठी वचनबद्ध असून हृदयरोगावरही माफक दरात उपचार देत आहोत. हुबळी येथे निर्माण केलेले हॉस्पिटल दोन महिन्यात सार्वजनिकांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. बेंगळूर येथेही लवकरच सार्वजनिकांच्या सेवेसाठी हॉस्पिटल खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. जागतिक हृदय दिनानिमित्त केएलई व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. आपल्या जीवनशैलीत बदल करून प्रत्येकाने निरोगी राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद म्हणाले, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलवतीने आधुनिक पद्धतीने उपचार केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देणारे हे हॉस्पिटल आता वैद्यकीय पर्यटन सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संजय पोरवाल म्हणाले, शारीरिक श्रमाविना अनेक आजार बळावत आहेत. कामाच्या ताणामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढला असून हृदयाची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेश पट्टेड म्हणाले, तणावपूर्ण जीवन, व्यसनाधिनता पूर्णपणे सोडून आपले हृदय निरोगी ठेवता येते. चांगल्या सवयी अंगिकारून निरोगी आरोग्य राखले पाहिजे. फास्टफूड टाळून संतुलित आहाराचे सेवन करावे. दररोज व्यायाम केल्यामुळे हृदयरोग टाळता येऊ शकतो, असे ते म्हणाले. कार्डियाक टेक्निशियनच्या पथकाने हृदय आरोग्यावर लघुपट सादर केला. याप्रसंगी डॉ. समीर अंबर, डॉ. प्रसाद एम. आर., डॉ. विजयानंद मेटगुडमठ, डॉ. विश्वनाथ हेसनूर, डॉ. सुहासिनी अथर्गा आदी उपस्थित होते.