बागायत खात्याचा जि. पं. मध्ये संवाद कार्यक्रम
बेळगाव : एशियन डेव्हल्पमेंट बँकेच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. जिल्ह्यामध्ये बागायती पिके घेण्यासाठी येणाऱ्या समस्या, बागायत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना, बाजारपेठ, व्यापार संपर्क, तसेच मूल्यावर्धीत प्रक्रिया केंद्रे वाढविण्यासाठी शेतकरी, रयत उत्पादक संस्था, तसेच शेतकरी स्वसाहाय्य गटांना येणाऱ्या समस्या याबाबत माहिती देण्यासाठी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. जि. पं. सभागृहात मंगळवारी झालेल्या एशियन डेव्हल्पमेंट बँकेच्या अनुदानित योजनासंबंधी प्रस्ताव तयार करण्याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
बागायत पिकांची उत्पादने वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न द्विगुणीत करण्यासाठी मूलभूत सुविधा राबविण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच या कार्यात सार्वजनिक व खासगींचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे शिंदे म्हणाले. कृषी व नैसर्गिक साधन संपत्ती तज्ञ राघवेंद्र नडवीनमनी, कृषीतज्ञ व सल्लागार मेघना पांडे, ग्रामीण अर्थ विभागाचे तज्ञ अलोककुमार सिंग, कृषी खात्याचे मोनप्पा, बेळगाव विभाग बागायत खात्याचे सहसंचालक आय. के. दोड्डमनी, धारवाड विभाग बागायत खात्याचे उपसंचालक काशिनाथ भद्रन्नवर, बेळगाव विभाग बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, तसेच बेळगाव, धारवाड, हावेरी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संघाचे प्रतिनिधी, लीड बँकेचे व्यवस्थापक, नाबार्ड संस्थेचे प्रमुख आदी उपस्थित होते.