Kagal News : कागलमध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
कागलमध्ये मधमाश्यांचा कहर
कागल : कागल शहर परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कागल-सांगाव रोडवरील अलका शेती फार्म परिसरात घडलेल्या घटनेत मधमाश्यांच्या हल्ल्यात एका घोड्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन महिलांसह आठ ते नऊ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
कागल - सांगाव रोडवरील अलकाशेती फार्म परिसरात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सचिन सोनुले आपल्या कुटुंबातील सदस्यासह उसाचे वाडे आणण्याकरिता गेले होते. यावेळी त्यांनी छकड्याला बांधलेल्या घोड्याला शेतातील बांधावर चरण्यासाठी बांधला होता. ऊस तोडणी मजुरांसह सचिन ऊस तोडण्याचे काम करत होते. यावेळी ऊस तोडताना उसाच्या फडात असलेल्या मधमाश्या अचानक बाहेर पडल्या. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांसह सर्वजण
मधमाश्याच्याहल्ल्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी पळत सुटले. या मधमाश्यांनी बांधावर बांधलेल्या घोड्याला लक्ष्य केले. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्यात हा घोडा गंभीर जखमी झाला. तसेच सचिन सोनुले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन महिला आणि ऊस तोडणी मजूर असे आठ ते नऊ जण किरकोळ जखमी झाले. सोनुले यांनी जखमी घोड्यावर खासगी पशुवैद्यकीयअधिकाऱ्याकडून उपचार केले. मात्र तासाभरानंतर घोड्याचा मृत्यू झाला.
परिसरात भीतीचे वातावरणदोनच दिवसापूर्वी शहरातील निपाणी वेस परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्यात एका महिलेसह तिघे गंभीर जखमी झाले होते. दोनच दिवसात पुन्हा मधमाश्यांनी घोड्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले उपचार केले असतानाही या घोड्याचा मृत्यू झाला. तसेच ऊस तोडणाऱ्या आठ ते नऊ जणांनाही मधमाशांनी लक्ष्य केले.