परधर्मो भयावहा...
एकदा एका जंगलात तळ्याच्या काठी खूप घनदाट झाडी होती. त्या झाडांवरती वेगवेगळे पक्षी खेळायचे. प्राणी प्रसंगी दमलेभागले की विसावा घ्यायला यायचे. तळ्याच्या काठी पाणी पिऊन झालं की या झाडांमधून फिरायचे. अगदी बागेत आल्यासारखे. या तळ्यामध्ये देखील विविध प्रकारचे मासे, कासव, खेकडे आणि इतर प्राणी होतेच. पण माशांच्या मुलांना पाण्यात खेळून खेळून खूप कंटाळा यायचा. मग ते तळ्याच्या काठाला येऊन इकडे तिकडे गंमत बघायचे, कधी भयंकर डरकाळी ऐकू यायची तर कधी जीवघेणे आवाज ऐकू यायचे. कधी पक्षांचा चिवचिवाट तर कधी मोराची साद. त्यांना वाटायचं केव्हा एकदा बाहेर जातो आणि हे जग जाऊन बघावं. तसा ते प्रयत्न देखील करत पण जरा पाण्याच्या बाहेर आले की त्यांचा जीव गुदमरायला लागायचा. मग आता आपण कोणाशी खेळणार? असा प्रश्न त्यांना सारखा भेडसावायला लागायचा. मग ते इकडे घरी येऊन म्हणायचे आई ग आई, आम्ही कोणाशी तरी खेळतो ना! आईने सांगितलं तुम्ही तुमचं, आपलं आपलं तिथे पाण्यात खेळायचं. परंतु पिल्लंच ती, ऐकणार कसली! एक दिवस तळ्याच्या काठावर पोहोत पोहोत आली आणि वरती झाडाकडे बघू लागली. झाडावरती एक निळ्या रंगाचा तपकिरी चोचीचा खंड्या नावाचा पक्षी बसलेला होता. त्याने तळ्याकडे डोकावलं आणि पाहिलं की छोटी छोटी माशाची पिल्लं छान इकडे तिकडे खेळत आहेत. त्यांनी त्याच्या आवाजात काहीतरी चोच उघडून सांगितलं. त्या पक्षांना काही कळलंच नाही. मग पक्षी आणि मासे एकमेकांशी काहीतरी बोलू लागले. मग पक्षालाही काही कळलं नाही पण दोघे एकमेकांकडे पाहून आपापल्या स्वरात बोलत असत. असा त्यांचा हळूहळू खेळ सुरू झाला. पक्षाने काहीतरी वरुन आवाज केला, की मासे सुळकन उडी मारून दाखवायचे. माशाने उडी मारली की पक्षी पण इकडून तिकडे उडायचा अशी त्यांची छान मैत्री झाली. पण हे मासे आपल्याला खायला मिळायला हवेत यासाठी तो पक्षी सतत काहीतरी विचार करु लागला. त्यांनी माशांना जरा कडेला या, इकडे या असं म्हणून पाहिलं तर मासे आईने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे पोहत राहायचे. पाण्याच्या वरती अजिबात यायचे नाहीत. आता या पक्षाच्या डोक्यात एक नवीन कल्पना आली. त्यांनी सांगितलं आपण नवीन खेळ खेळू या ...बरं का रे... मी वरून पान टाकीन ते पान ओढत तुम्ही तिकडच्या कडेला नेऊन ठेवायचं. तसं केलं की मी तुम्हाला छान उड्या मारून दाखवीन. माशांना ही कल्पना आवडली. मग खंड्यानं ठरल्याप्रमाणे झाडावर बसून एक एक पान तोडून वरनं टाकलं की दोन दोन मासे ते पान तोंडात धरून तळ्याच्या कडेला पोहोचवण्याचे काम पूर्ण करायचे. मग खंड्या उड्या मारून दाखवायचा. हा खेळ त्यांना खूप आवडला. एक दिवस असंच एक पान वरून टाकल्यानंतर तीन-चार माशांनी मिळून ते पटकन दुसऱ्या कडेला न्यायचं ठरवलं. पण काय झालं कुणास ठाऊक ते पान नेता नेता वरून खंड्या पक्षी उडाला आणि झटकन पाण्यामध्ये येऊन त्यांनी एक मासा आपल्या चोचीमध्ये पकडून पटकन झाडांमध्ये दिसेनासा झाला. सगळे मासे आपल्याबरोबरचा सहकारी गेला कुठे म्हणून इकडे तिकडे घाबरून बघू लागले आणि मग त्यांनी हा पक्षी कुठे दिसतोय का पाहायला सुरुवात केली...तर पक्षी त्यांना दिसेना आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या पक्षाने चतुराई करून आपल्याला एका ठिकाणी बोलवलं आणि स्वत:चा कार्यभाग उरकला. ही मुलं धावत धावत आईकडे गेली आणि आईला झालेली सर्व हकीगत व घटना सांगितली. अर्थातच एक सदस्य कमी झाल्याचे दु:ख आईला झालं. तेव्हा आईने तेच पुन्हा सांगितलं. आपण आपल्याच लोकांमध्ये, आपल्या माणसांमध्ये नेहमी राहावं, तेच जास्त सुरक्षिततेचं आहे. दुसऱ्यांच्याकडे जायचा प्रयत्न केला तर काय गत किंवा स्थिती होते, याची तुम्हाला कल्पना घडलेल्या घटनेवरुन आली असेलच. त्या दिवसापासून माशांनी पुन्हा खंड्याशी मैत्री केली नाही.