ओडिशातील 24 किनारी गावं ‘त्सुनामी रेडी’ घोषित
युनेस्कोने देखील दिली मान्यता
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशातील 24 किनारी गावांना ‘त्सुनामी रेडी’ (त्सुनामीच्या आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज) घोषित करण्यात आले आहे. युनेस्कोच्या ‘इंटर गव्हर्नमेंटल ओसीनोग्राफिग कमिशन’ने ही 24 गावं त्सुनामी रेडी असल्याची मान्यता देत प्रमाणपत्र जारी केले आहे.
बालासोर, भद्रक, केंद्रपाडा, जगतसिंहपूर, पुरी आणि गंजम जिल्ह्dयातील गावांना त्सुनामीच्या आपत्तीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर जगतसिंहपूर जिल्ह्यातील नोलियासाही तर गंजम जिल्ह्यातील वेंकटरायपूरच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही गावांना 2020 मध्येच त्सुनामी रेडी घोषित करण्यात आले होते.
या गावांमध्ये सरकारने सर्व घटकांना आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच गावातील लोकांसाठी जागरुकता अभियान, त्सुनामी व्यवस्थापन योजना, प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर बचाव मार्गांची ओळख करून देण्यात आली आहे. नॅशनल त्सुनामी रेडी रिकग्निशन बोर्डाने या किनारी गावांचा दौरा करत 12 सूचक मुद्द्यांवरून पडताळणी केली आहे. याच 12 मुद्द्यांच्या आधारावरून गावांना त्सुनामी रेडी म्हणून घोषित केले जात असते. नॅशनल त्सुनामी रेडी रिकग्निशन बोर्डात नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशनचे वैज्ञानिक आणि एनडीआरएफचे अधिकारी सामील होते.
या बोर्डाने स्वत:च्या पुष्टीनंतर या गावांची नावे युनेस्कोकडे मंजुरीसाठी पाठविली होती. भारत सरकारने देशातील 381 गावांना त्सुनामी प्रभावित घोषित केले आहे. याच्याच अंतर्गत ओडिशा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राज्यातील त्सुनामी प्रभावित किनारी गावांना त्सुनामीसारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार करत आहे.