मधमाशीच्या डोक्यावर शिंग
ऑस्ट्रेलियात ‘लूसिफर’ पाहून वैज्ञानिकही चकित
ऑस्ट्रेलियात वैज्ञानिकांनी मधमाशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून याच्या डोक्यावर शिंग आहेत. स्वत:च्या अद्भूत रचनेमुळे ही मधमाशी चर्चेत आहे. वैज्ञानिकांनी नेटफ्लिक्सच्या शोने प्रेरित होत या मधमाशीला ‘लूसिफर’ हे नाव दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात असलेल्या गोल्डफील्ड्स जंगलांमध्ये वैज्ञानिक विलुप्त होण्याच्या वाटेवर असलेल्या काही जंगली फुलांचे सर्वेक्षण करत होते, याचदरम्यान त्यांना ‘मेगाचाइल लूसिफर’ नावाची मधमाशी दिसून आली. ही एक मादी मधमाशी असून तिच्या डोक्यावर अनोखे शिंग दिसून आले आहे. सैतानासारख्या शिंगांमुळे याचे नाव लूसिफर ठेवण्यात आल्याचे अध्ययनाचे मुख्य लेखक किट प्रेंडगॅस्ट यांनी सांगितले. मधमाशीची डीएनए टेस्टही करविण्यात आली आहे. आतापर्यंत जितक्या मधमाशांचा शोध लावण्यात आला आहे, यातील कुठल्याही मधमाशीचा डाटा याच्याशी जुळत नाही, यामुळे हा नवा शोध असल्याचे प्रेंडगॅस्ट यांनी म्हटले आहे.
लूसिफरच्या डोक्यावरील शिंग जवळपास 0.9 मिलिमीटर लांब आहे. तो या शिंगांद्वारेच फुलांपर्यंत पोहोचतो. घरट्याच्या सुरक्षेसाठी देखील तो स्वत:च्या शिंगांचाच वापर करतो. परंतु सध्या या मधमाशीवर अध्ययन सुरु आहे. संशोधन पूर्ण झाल्यावरच शिंगांच्या योग्य वापराविषयी कळू शकणार आहे. ऑस्ट्रेलिया नॅशनल सायन्स एजेन्सीनुसार देशात जवळपास 2000 हून अधिक मधमाशांच्या प्रजाती आहेत, यातील 300 हून अधिक मधमाशांना वैज्ञानिकांनी अद्याप कुठलेच नाव दिलेले नाही तसेच त्यांचा तपशीलही उपलब्ध नाही.