For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आस लागली जेतेपदाची...

06:36 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
आस लागली जेतेपदाची
Advertisement

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकातील अंतिम सामना रविवार 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या सामन्याकडेच तमाम भारतीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे किंबहुना सर्वत्र सध्या याचीच चर्चा होते आहे. अनेकांना आता आस लागली आहे ती विश्वचषकजेतेपदाची....

Advertisement

गेला महिनाभर विश्वचषकाचा थरार भारतात सुरु असला तरी भारताच्या सुरुवातीच्या विशेषत: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेचा उत्साह वाढत गेला. साखळी फेरीतील सलगच्या विजयानंतर मात्र भारताच्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले. भारत-पाकिस्तान सामन्यात डिस्नी हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण पाहणाऱ्यांची संख्या 3.5 कोटी होती नंतर भारत-न्यूझीलंड उपांत्य सामन्यात 5.3 कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या डिस्नी हॉटस्टारवर होती. यावरुन भारतात क्रिकेटचा ज्वर किती वाढलेला आहे, हे दिसून येते. अंतिम सामना होणारे अहमदाबादचे मोदी स्टेडियम हे 1 लाख 32 हजार प्रेक्षक बसू शकतील इतक्या दमदार क्षमतेचे आहे. त्यामुळे भारत आणि कांगारू या 2 दिग्गज संघातील अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार, हे कोणा जोतिषाला विचारण्याची गरज नाही. अहमदाबादमध्ये स्पर्धेत 4 सामने खेळविले गेले असून शेवटचा आणि पाचवा सामना रविवारी होत आहे. 5 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले होते. 282 धावांचे आव्हान 36.2 षटकात न्यूझीलंडने पूर्ण केले. दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील होता. भारताने 7 विकेट्सने पराभूत करताना 191 धावांचे आव्हान 30 षटकात लिलया पेलले. या स्टेडियमवरील तिसरा सामना 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. यात ऑस्ट्रेलिया 286 धावा काढून विजयी झाली. 10 नोव्हेंबरला आणखी एका सामन्यात 244 धावांचे अफगाणीस्तानचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 47 षटकात पूर्ण केले. या वरील सर्व सामन्यांचा आढावा घेतल्यास 286 ही सर्वाधिक धावसंख्या या मैदानावर यंदा नोंदली गेली. 2011 साली दक्षिण आफ्रिकेने 365 इतक्या सर्वाधिक धावा या मैदानावर काढल्या होत्या. एकंदर विचार केल्यास या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना नियोजित धावांचे उद्दिष्ट गाठता येते, हे स्पष्ट होते. अंतिम सामन्यात भारताला 350 पेक्षा जास्त धावा प्रथम काढून गोलंदाजांना विरोधी संघाच्या फलंदाजांवर दबाव टाकण्याचे काम करावे लागणार आहे. असे झाल्यास भारताला संधी असेल. पण कांगारुंनी समजा हीच धावसंख्या प्रथम उभारली तर, तर भारतीय फलंदाज धावांचा पाठलाग (यावेळच्या सर्व संघाविरुद्धच्या कामगिरीवरुन)करु शकतात, हे नक्की. येथे फलंदाज दडपणाला कसे तोंड देतात, हे पाहावे लागेल. तसे पाहता भारतीय फलंदाज, गोलंदाज यांचीच खरी कसोटी येथे दिसणार आहे. टॉस जिंकत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दोन्ही संघांना असेल. विश्वचषकात 13 वेळा आमनेसामने आलेत, ज्यात ऑस्ट्रेलिया 8 वेळा जिंकली आहे. सदरचे मैदान हे धिम्या खेळपट्टीसाठी गणले जाते. इथे फिरकी किंवा स्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना चांगली साथ मिळते. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीसाठी सहाय्य करणारे हे मैदान आहे. नवा चेंडू घेऊन गोलंदाजी करणाऱ्यांना हे मैदान मदत करते. 25 षटकानंतर फिरकी गोलंदाजांना या मैदानाची मदत चांगली होते, असेही दिसून आलेले आहे. वरील एकंदर आढावा पाहिल्यास भारतीय संघ फलंदाजीमध्ये पहिल्यांदा खेळताना आणि धावांचा पाठलाग करताना अधिक सक्षम दिसून आलाय. महत्त्वाचे म्हणजे फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची कामगिरी मान उंचावणारी ठरलीय. मध्यम गती आणि फिरकी गोलंदाज यांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत वाटला आहे. शेवटी विजयच महत्त्वाचा. तो कोणाकडे झुकतो ते पहायचे. पारडे भारताचेच जड आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.