होपच्या शतकाने विंडीजचा पराभव लांबला
वृत्तसंस्था /ख्राईस्टचर्च
शाय होपच्या नाबाद शतकामुळे येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजचा संभाव्य पराभव शेवटच्या दिवसापर्यंत लांबला. न्यूझीलंडने विंडीजने विजयासाठी 531 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले होते आणि विंडीजने दिवसअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 212 धावा जमविल्या. होप 116 तर ग्रिव्स 55 धावांवर खेळत आहे.
या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 231 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 167 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 64 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. कर्णधार लॅथम आणि रचिन रवींद्र यांनी दमदार शतके झळकविताना तिसऱ्या गड्यासाठी 279 धावांची भागिदारी केली. लॅथमने 250 चेंडूत 12 चौकारांसह 145 तर रचिन रवींद्रने 185 चेंडूत 1 षटकार आणि 27 चौकारांसह 176 धावा झळकविल्या. न्यूझीलंडने 4 बाद 417 या धावसंख्येवरुन शुक्रवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. त्यांनी आपला दुसरा डाव 8 बाद 466 धावांवर घोषित करुन विंडीजला निर्णायक विजयासाठी 531 धावांचे कठीण आव्हान दिले. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात खेळाच्या चौथ्या दिवशी आणखी चार गडी 44 धावांत गमविले. विंडीजच्या केमर रॉचने 78 धावांत 5 तर शिल्ड्सने 74 धावांत 2 तर सील्सने 1 गडी बाद केला. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची रॉचची ही 12 खेप आहे. उपाहारापूर्वी न्यूझीलंडने आपला दुसरा डाव घोषित केला. उपाहारापर्यंत विंडीजने 11 षटकात बिनबाद 20 धावा जमविल्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर न्यूझीलंडच्या डफीने सलामीच्या कॅम्पबेलला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. डफीने विंडीजला आणखी एक धक्का देताना चंद्रपॉलला 6 धावांवर बाद केले. ब्रेसवेलने अॅथनेझला 5 धावांवर झेलबाद केले. कर्णधार चेस हेन्रीच्या गोलंदाजीवर 4 धावा जमवित लॅथमकरवी झेलबाद झाला. विंडीजची यावेळी स्थिती 4 बाद 72 अशी होती.
शाय होप आणि ग्रिव्स यांनी संघाचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 140 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी विंडीजने 4 बाद 107 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या शेवटच्या सत्रात शाय होपने आपले शतक 1 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 139 चेंडूत झळकविले. ग्रिव्ससमवेत त्याने शतकी भागिदारी 173 चेंडूत झळकविली. ग्रिव्सने 123 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या दिवसाअखेर विंडीजने दुसऱ्या डावात 74 षटकांत 4 बाद 212 धावा जमविल्या. होप 116 तर ग्रिव्स 55 धावांवर खेळत आहेत. विंडीजला हा सामना जिंकण्यासाठी आणखी 319 धावांची जरुरी असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत. विंडीजच्या दुसऱ्या डावात डफीने 2 तर ब्रेसवेल आणि हेन्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 231, विंडीज प. डाव 167, न्यूझीलंड दु. डाव 109 षटकांत 8 बाद 466 डाव घोषित (रचिन रवींद्र 176, लॅथम 145, कॉन्वे 37, यंग 23, ब्रेसवेल 24, अवांतर 23, रॉच 5-78, शिल्ड्स 2-74, सील्स 1-72), विंडीज दु. डाव 74 षटकांत 4 बाद 212 (होप खेळत आहे 116, ग्रिव्स खेळत आहे 55, चेस 4, कॅम्पबेल 15, चंद्रपॉल 6, अॅथनेझ 5, अवांतर 11, डफी 2-65, ब्रेसवेल, हेन्री प्रत्येकी 1 बळी).