कर्नाटकात हुक्का बारवर बंदी! आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याकडून आदेश जारी
बेंगळूर : राज्य सरकारने जनतेच्या आरोग्यहितासाठी सर्व प्रकारच्या हुक्का उत्पादनांची विक्री, सेवन, जाहिरात, प्रसार, साठा करणे यावर निर्बंध घातले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने बुधवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला आहे. हुक्का तंबाखू किंवा निकोटीनयुक्त, निकोटीनरहित, तंबाखूरहित, स्वादयुक्त हुक्का, मोलॅसिस, शिशा आणि याच प्रकारच्या इतर नावांनी ओळखल्या जाणाऱ्या हुक्का उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोट्पा कायदा-2003, बालसंरक्षण कायदा-2015, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-2006, कर्नाटक विष (संपादन व विक्री) नियम-2015 आणि भारतीय दंड संहिता व अग्नी नियंत्रण-अग्नी सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन केल्याने तेथील आहार पदार्थ नागरिकांसाठी असुरक्षित बनतात. नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका आहे. राज्यघटनेच्या 47 व्या परिच्छेदात उल्लेख असल्याप्रमाणे नागरिकांचे आरोग्य जपणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. या अनुषंगाने हुक्का उत्पादनांच्या सेवनावर बंदी घालण्यात आली आहे.