हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेला आज प्रारंभ
सात्विक-चिराग यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था / हाँगकाँग
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्यहा 2025 च्या बॅडमिंटन हंगामातील हाँगकाँग सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
सात्विक आणि चिराग या तृतिय मानांकीत जोडीने अलिकडेच झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हाँगकाँग स्पर्धेतही जेतेपदाची आशा निर्माण झाली आहे. चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामातील विविध स्पर्धांमध्ये सात्विक आणि चिराग यांच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. भारत, मलेशिया, चीन आणि सिंगापूर येथे झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सात्विक आणि चिराग यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. आठवी मानांकीत जोडी सात्विक आणि चिराग यांचा सलामीचा सामना चीन तैपेईचा चियु चेह आणि वेंग लिंग यांच्याबरोबर होणार आहे. तर महिलांच्या विभागात पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफर्सन बरोबर होईल.
पुरूष विभागात अमेरिकन खुल्या स्पर्धेतील विजेता आयुष शेट्टीचा पुरूष एकेरीतील पहिला सामना चीनच्या लु झू बरोबर होणार आहे. भारताचा आणखी एक पुरूष बॅडमिंटनपटू सहावा मानांकीत लक्ष्य सेन सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 24 वर्षीय लक्ष्य सेनने चौथे स्थान मिळविले होते. त्याचा हाँगकाँग स्पर्धेतील सलामीचा सामना चीन तैपेईच्या वेंग वेईशी होणार आहे. एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना जपानच्या नाराओकाशी होईल. महिला एकेरीच्या विभागात भारताच्या अनुपमा उपाध्यायचा सलामीचा सामना जपानच्या मियाझेकीशी तर रक्षिता रामराजचा सलामीचा सामना थायलंडच्या पाचव्या मानांकीत रेचनॉक इंटेनॉनशी होईल. महिलांच्या दुहेरीत ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा भगिनी भारताचे प्रतिनिधीत्व करतील. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो तसेच रोहन कपूर आणि ग•s ऋत्विका शिवानी या स्पर्धेत भारताकडून खेळत आहेत. चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात किदांबी श्रीकांत, तरुण मणिपल्ली यांना पात्र फेरीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. किरण जॉर्जचा सलामीचा सामना मलेशियाच्या वेई बरोबर तर एस. शंकर मुथुसामीचा सलामीचा सामना कॅनडाच्या हांग बरोबर होईल.