प्रामाणिकतेचा भाजपमध्ये सन्मान
राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांचे प्रतिपादन : भाजपच्या नूतन मंडळ अध्यक्षांचा सामूहिक सन्मान
पणजी : भारतीय जनता पक्षात जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला पक्ष कधीच विसरत नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याबरोबरच कार्यकर्ता म्हणूनही जो पक्षहितासाठी झटतो, त्याला निश्चितच भाजपात सन्मान आहे. कोणीही स्वत:ला उच्च मानू नये आणि कमीही लेखू नये. कार्यकर्त्यांमुळेच आज पक्ष मजबूतपणे उभा आहे. नेत्यांनीही कार्यकर्त्यांना परिवार म्हणून कायम बांधून ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक बूथ मजबूत करणे यातच पक्षाचे हित आहे, असे मार्गदर्शन भाजपचे केंद्रीय सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार अऊण सिंग यांनी केले.
पणजी येथे काल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात नवनिर्वाचित 36 मंडळ अध्यक्षांचा सामूहिक सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, गणेश गावकर, दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार दामू नाईक, बाबू कवळेकर, सुलक्षणा प्रमोद सावंत उपस्थित होत्या.
निवडणुकीसाठी कार्यरत रहा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, येत्या मार्च 2025 मध्ये पालिका निवडणुका होणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होईल. 2027 सालामध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे मंडळ अध्यक्षांनी राज्यात भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी आतापासूनच झटून काम करायला हवे.
मंडळाध्यक्षपदी सर्वांना प्रतिनिधीत्व : तानावडे
प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले, मंडळ अध्यक्ष निवडताना पक्षाने कोणत्याच पातळीवर भेदभाव केलेला नाही. ज्यांना मंडळ अध्यक्षपदी निवडलेले आहे, त्यामध्ये ओबीसी, एसटी, एससी या सर्वच घटकातील युवकांना प्रतिनिधित्व दिलेले आहे. प्रियोळ, कुडतरी व फातोर्डा या मतदारसंघात तीन महिलांना मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. मंडळ अध्यक्ष निवडताना आमदारांनी कोणत्याही प्रकारे दबाव घातलेला नाही. सर्व मंडळ अध्यक्ष पक्षाच्या सहमतीनेच निवडण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुणीही मनात अडी ठेवून नाराज न होता पक्षहिताला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहनही तानावडे यांनी केले.
युवा ब्रिगेड भाजपला यशस्वी करेल
भाजपच्या मंडळ अध्यक्षपदी निवडण्यात आलेले 50 ते 60 टक्के कार्यकर्ते हे युवा मोर्चातील आहेत. पक्षाने 45 वर्षांखालील मंडळ अध्यक्ष दिलेले आहेत. भाजप आता आणखी युवा झालेला असल्याने ही युवा ब्रिगेड निश्चितच येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
आमदाराहून मंडळाध्यक्षाची जबाबदारी मोठी : मुख्यमंत्री
गत 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मंडळ अध्यक्षांनी घेतलेल्या कष्टामुळेच भाजपचे उमेदवार निवडून आले. मंत्री व आमदारांना काहीवेळा मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. हे काम मंडळ अध्यक्षांनी उत्तमपणे बजावावे. पक्षाच्या धोरणामुळे काहीवेळा उमेदवार बदलला जातो, अशा वेळी कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून साथ द्यायला हवी. कारण आमदारापेक्षा मंडळ अध्यक्षाची जबाबदारी मोठी असते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
जाहीरपणे वक्तव्ये करण्यापूर्वी चर्चा करावी
पक्षाच्या नेत्याविषयी किंवा पक्षाविषयी जर मत मांडायचे असेल, तर त्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी. पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेतल्यानंतर मतभेद मिटवले जाऊ शकतात. त्यामुळे यापुढे जाहीरपणे वक्तव्ये करण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आमदार नीलेश काब्राल यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याचा दाखला देत जाहीरपणे मत व्यक्त केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलताना असे प्रकार यापुढे थांबवायला हवेत, असे सांगितले. कुडचडे येथे ऊग्णालयाचे उद्घाटन होऊन एक वर्ष झाल्यानंतरही तेथे सुविधा पुरवल्या जात नसल्याने काब्राल यांनी भाष्य केले होते. त्यामध्ये कुणाचेही मन दुखावण्याचा प्रयत्न नव्हता, असे आमदार काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पत्रकारांना सांगितले.