फोंड्यात आलें-लसूण पेस्टचा काळाबाजार
बेकायदेशीर भंगार अड्ड्यात सापडले चक्क पेस्टचे घबाड : पेस्ट फास्ट फुड स्टॉलवर विकली जाण्याचा संशय
फोंडा : फोंडा नगरपालिकेने एका बेकायदेशीर भंगार अड्ड्यावर केलेल्या कारवाई दरम्यान तेथे बनावट आले व लसूण पेस्टचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारखंडे-फोंडा येथील शीतल बार अँड रेस्टॉरंटजवळ रशिद खान हा बेकायदेशीर भंगार अड्डा चालवत आहे. हा अड्डा हटविण्याची कारवाई सुऊ असताना तेथे मोठ्याप्रमाणात आले व लसूण पेस्टचे प्लास्टिक डबे सापडले. या प्रकारामुळे भंगार अड्ड्यांच्या आडून कायकाय प्रकार चालतात आणि त्याकडे पोलिसांसह सर्व संबंधीत सरकारी यंत्रणांचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फोंडा पालिकाक्षेत्रात चार ठिकाणी चालणारे बेकायदेशीर भंगार अड्डे बंद करण्यासाठी चार ते पाचवेळा नोटिसा पाठवूनही ते बिनधास्तपणे सुऊ होते. चारपैकी वारखंडे येथील मुक्तीधाम स्मशानभूमिजवळ असलेल्या भंगार अड्डेवाल्याने कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. उर्वरीत तीन अड्ड्यांना पंधरा दिवसांपूर्वी शेवटची नोटिस बजावल्यानंतर काल मंगळवार दि. 7 रोजी फोंडा पालिकेने टाळे ठोकण्यासाठी कारवाई सुऊ केली.
भंगारात सापडले आले-लसूणाचे घबाड
वारखंडे येथील शीतल बारजवळ असलेल्या रशिद खान याच्या मालकीच्या इमरान ट्रेडर्स या भंगार अड्ड्यावर कारवाई सुऊ केली असता आंतमध्ये मोठ्या प्रमाणात आले व लसूणच्या पेस्टचे जणू घबाडच आढळून आले. आले व लसूणाच्या पेस्टबरोबरच मोठ्या प्रमाणात फ्राईड कांदा, मसल्याची काही पाकिटे व चूल पेटवण्याची शेगडीही सापडली आहे. पालिकेचे मुख्य अभियंते व निरीक्षकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यानी अन्न व औषध प्रशासनाशी फोनवरुन संपर्क साधून तक्रार नोंदविली.
आरोग्यास घातक आले-लसूणची पेस्ट
गेल्या पाच वर्षांपासून हा अड्डा बेकायदेशीररित्या तेथे चालतो. मात्र भंगार अड्ड्याच्या आड आले व लसूण पेस्टचा काळाबाजार कधीपासून सुऊ आहे, हे कळायला मार्ग नाही. तेथे साठवून ठेवलेल्या कळकट व जुन्या प्लास्टिक डब्यावऊन अंदाज घेतल्यास वापराची तारीख संपलेल्या आले-लसूणाच्या पेस्टचे डबे विकत घेऊन त्यावर नव्याने वापरात आणण्याचे लेबल लावले जात असल्याची शक्यता आहे. ही पेस्ट फास्ट फुडच्या स्टॉलवर विकली जात असावी.
‘फसाय’चे मानांकन खरे की खोटे?
धक्कादायक गोष्ट म्हणजे, रॉयल एंटरप्रायझेस असा लेबल असलेल्या पाच किलो वजनाच्या या प्लास्टिक डब्यांवर फसाय म्हणजेच अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणच्या मान्यतेचे मानांकन दिसत आहे. उत्पादनाची तारीख जानेवारी 2025 तर वापराची मुदत चार महिने अशी नोंदविण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात हे डबे जुने व कळकट अवस्थेत असून त्यात गफला असल्याचे दिसते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने दुपारी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ निरीक्षक शिवदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या पेस्टचे काही नमुने गोळा कऊन सर्व साहित्य जप्त करण्यात आले. त्यासंबंधीचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. भंगार अड्ड्यांमध्ये खाद्यपदार्थांसाठी वापरले जाणारे हे साहित्य कोठून आणले जायचे व केव्हापासून हा काळाबाजार चालला आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
भगारवाल्याकडून पाच जणांना भाडे
फोंडा पालिकेकडून वारखंडे येथील या भंगार अड्ड्याबरोबरच तळे, दुर्गाभाट व कला मंदिरजवळ असलेल्या तीन अड्ड्यांना टाळे ठोकण्यात आले. वारखंडे स्मशानभूमिजवळ असलेल्या भंगार अड्डा चालकाने न्यायालयात दाद मागितल्याने तूर्त त्याच्यावरील कारवाई टळली आहे. शीतल बारजवळ असलेला भंगार अड्डा गेल्या पंधरा वर्षांपासून सुऊ आहे. मध्यंतरी कोरोना काळात तो हटविण्यात आला होता. मात्र पोलिस व राजकारण्यांच्या आशीवार्दाने त्याने पुन्हा त्याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. तेथील बिल्डरने सोडलेल्या खुल्या जागेत अगदी खुलेआमपणे हा बेकायदेशीर अड्डा चालतो. वारखंडे व कुर्टी येथील दोघे व चिरपुटे येथील एक अशा पाच लोकांना अड्डाचालक रशिद खान महिन्याकाठी ऊ. 17 हजार असे जागेचे भाडे देत आहे. अन्य तीन अड्डे खासगी जागेत चालतात. मात्र फोंडा पालिका क्षेत्रातील हे सर्व चारही अड्डे बेकायदेशीर असल्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक व मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांनी सांगितले. सर्व चारही अड्डे लोकवस्तीला लागून असल्याने सुरक्षा व अन्य कारणास्तव त्यांना कायदेशीर परवाना मिळू शकत नाही. सर्व अड्डे बेकायदशीर असल्याने पालिका क्षेत्रात त्यांना मुळीच थारा नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका अभियंते विशांत नाईक, कनिष्ठ अभियंते सनम नाईक, निरीक्षक अविनाश नाईक, सिद्धेश गावडे, सर्वेश नाईक व अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.