बिहारमध्ये होमगार्ड उमेदवारावर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार
शारीरिक चाचणीदरम्यान धावताना बेशुद्ध : चालक-तंत्रज्ञांनी रुग्णालयात घेऊन जात असताना केला बलात्कार
वृत्तसंस्था/ गयाजी
बिहारमधील गयाजी येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका 26 वर्षीय महिला उमेदवारावर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञाला अटक केली आहे. या घटनेनंतर आरोपीने पीडितेला गप्प बसण्याची धमकी दिली होती.
होमगार्ड भरतीदरम्यान बेशुद्ध पडलेल्या महिला उमेदवारावर रुग्णवाहिका चालकावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. गयाजीतील बोधगया येथे होमगार्ड भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरू होती. पळण्याच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी आलेली एक महिला उमेदवार धावताना पडल्यामुळे बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना चालक आणि एका तंत्रज्ञांनी रुग्णवाहिकेतच तिच्यावर अतिप्रसंग केला.
पीडित महिला उमेदवार गयाजी जिह्यातील इमामगंज येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. बोधगया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव विनय कुमार असे असून तो रुग्णवाहिका चालक आहे. दुसरा आरोपी अजित कुमार हा तंत्रज्ञ असून तो नालंदा जिह्यातील चांदपूर येथील रहिवासी आहे.
बलात्काराची घटना रुग्णवाहिकेतच घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेच्या चालक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्याने रुग्णवाहिकेतच बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात बोधगया पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी अधिकृत माहिती देताना या कठीण प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.