90 वर्षांवरील लाभार्थ्यांना घरपोच रेशन
अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांची माहिती : ज्येष्ठ लाभार्थ्यांना मिळणार दिलासा
बेळगाव : 90 वर्षांवरील वृद्ध लाभार्थ्यांना रेशन आणताना अडचणी येतात, अशा लाभार्थ्यांना आता घरापर्यंत रेशन पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री मुनियप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे रेशनसाठी होणारे हाल थांबणार आहेत. राज्यात 4.40 कोटी लाभार्थी आहेत. त्यापैकी 90 वर्षांवरील लाभार्थ्यांची संख्या एक लाखापर्यंत आहे. जिल्ह्यात एपीएल, बीपीएल, अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या 14,70,018 इतकी आहे. यामध्ये 90 वर्षांवरील लाभार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या लाभार्थ्यांना आता घरापर्यंत रेशनपुरवठा करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत याची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यातील 40 लाख बीपीएल कार्डधारकांना 20 लाख टन रेशन वितरित केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी वयोवृद्ध नागरिक रेशनपासून वंचित राहात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने वृद्ध नागरिकांच्या सुविधेसाठी घरपोच रेशनपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 90 वर्षांवरील लाभार्थ्यांना आता रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाही. घरपोच धान्याचे वाटप शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एपीएल कार्डधारक 3,22,712, बीपीएल कार्डधारक 10,78,753 तर अंत्योदय कार्डधारकांची संख्या 68,553 आहे. यामध्ये 90 वर्षांवरील ज्येष्ठ लाभार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. दरम्यान वृद्ध लाभार्थ्यांना रेशन आणण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी त्यांना घरपोच पुरवठा केला जाणार आहे.
जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची नोंद
- रेशनकार्ड एकूण कार्डधारक
- एपीएल 3,22,712
- बीपीएल 10,78,753
- अंत्योदय 68553
- एकूण 14,70,018