महाकुंभमध्ये भूतान नरेशांकडून पवित्र स्नान
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केले स्वागत : अक्षयवटचे घेतले दर्शन
वृत्तसंस्था/ प्रयागराज
प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमध्ये देशासोबत विदेशातूनही भाविक सामील होत आहेत. याचदरम्यान मंगळवारी भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक यांनीही संगमक्षेत्री पवित्र स्नान केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी प्रयागराज येथे महाकुंभमध्ये सामील होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाकुंभ परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भूतानचे नरेश मंगळवारी सकाळी 10 वाजता विशेष विमानाने बमरौली विमानतळावर पोहोचले होते. तेथून हेलिकॉप्टरने ते अरेल घाटावर दाखल झाले, जेथे त्यांनी पवित्र स्नान केले आहे. भूतान नरेश आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूजनानंतर अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरात जात दर्शन घेतले आहे.
यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी 77 देशांच्या 118 सदस्यीय शिष्टमंडळाने महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले हेते. यात अनेक देशांच्या मुत्सद्द्यांसोबत त्यांचा परिवारही सामील होता. महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या 77 देशांमध्ये रशिया, बोलीविया, झिम्बाम्बे, लातविया, उरुग्वे, नेदरलँड, मंगोलिया, इटली, जपान, जर्मनी, जमैका, अमेरिका, स्वीत्झर्लंड, पोलंड, कॅमेरून, युक्रेन, स्लोवेनिया आणि अर्जेंटीना यासारख्या देशांचे राजनयिक सामील होते. या विदेशी राजनयिकांनी महाकुंभमधील व्यवस्थापनाचे कौतुक केल्याचे उत्तरप्रदेश सरकारकडून सांगण्यात आले.