For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये हिंदू सणांसाठीची सुटी रद्द

06:38 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये हिंदू सणांसाठीची सुटी रद्द
Advertisement

मुस्लीम सणांकरता वाढीव सुटी : राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमधील नितीश कुमार सरकारने नवे शैक्षणिक कॅलेंडर जारी केले असून यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने शिवरात्री, जन्माष्टमी या सणांसाठीची सुटी रद्द करत ईद-बकरी ईदसाठीची सुटी वाढविली आहे.  नितीश कुमार यांचे सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. मतपेढीसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, परंतु हा निर्णय राज्य सरकारला बदलावाच लागेल असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी दिला आहे.

Advertisement

मागील वर्षी देखील अशाचप्रकारचे प्रकरण समोर आल्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित आदेश मागे घेतला होता. यामुळे यावर्षी देखील सरकारकडून निश्चितच दखल घेतली जाईल. हा निर्णय मुख्य सचिव आणि संबंधित मंत्र्यांनी पाहिला नसावा. हा विषय लोकांच्या भावनांशी निगडित आहे. दीर्घकाळापासून हिंदूंच्या सणांना सुटी देण्यात येत असल्याचे वक्तव्य बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी केले आहे.

सुटी रद्द करण्यात आल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातात.  कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचविली जाऊ शकत नाही. लोकांनी चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री याप्रकरणी निश्चितच हस्तक्षेप करतील. संबंधित निर्णय अधिकारी स्तरावर घेण्यात आला असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.

बिहार सरकार सनातन धर्मीयांचा सन्मान करत नाही. हिंदू धर्माशी निगडित सणांच्या सुटी रद्द करण्याचा निर्णय निंदनीय आहे. महाशिवरात्री सारख्या सणाची सुटी रद्द करण्यात आल्याचे कळल्यावर दु:ख झाले. दुसऱ्या धर्माच्या सुटी हव्या तेवढ्या वाढवा, परंतु हिंदू सणांच्या सुटी रद्द करू नका अशा शब्दांत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल शर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे.

शाळांमध्ये सणांसाठीच्या सुटी रद्द करण्याच्या निर्णयाचे राजदने समर्थन केले आहे. शिक्षण आवश्यक आहे का शिक्षण? भाजपचे लोक ब्राह्मणवाद लादू पाहत आहेत. राजद सरकारमध्ये असून आमचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचे वक्तव्य राजद नेते श्याम रजक यांनी केले आहे.

नितीश सरकार बिहारमध्ये इस्लामिक धर्माच्या आधारावर काम करत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते. याचमुळे अररिया, पूर्णिया आणि कटिहार यासारख्या ठिकाणी शुक्रवारी शाळांना सुटी दिली जात आहे. आता नितीश सरकार पूर्ण बिहारमध्ये शुक्रवारीच शाळांना सुटी देण्याची योजना आखत असावी. हिंदू सणांसाठीची सुटी बहाल न केल्यास नितीश कुमारांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.