शाळा-पदवीपूर्व महाविद्यालयांना आज सुटी
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यात मंगळवारी धुवाधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे अवघड असल्याने बुधवार दि. 25 रोजी बेळगाव शहर, बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी एका पत्रकाद्वारे बुधवार दि. 25 रोजी शाळांना सुटी असल्याचे जाहीर केले. बेळगाव व खानापूर तालुक्यात मंगळवारी दिवसभरात झालेल्या पावसामुळे सुटी जाहीर करण्याची मागणी शिक्षक संघटनेने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून अहवाल मागवून ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नदी, तसेच नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून सुटी जाहीर करण्यात आली.