खानापूर शहरासह तालुक्यात उद्यापासून होलिकोत्सव
पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन : ग्रामीण भागात धूळवडीच्या दिवशीच रंगपंचमी
खानापूर : खानापूर शहर आणि तालुक्यात होलिकोत्सवाला गुरुवारपासून पारंपरिक पद्धतीने सुरुवात होणार आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी होळी साजरी होणार आहे. ग्रामीण भागातील कणकुंबी, जांबोटी यासह पश्चिम भागात होलिकोत्सव उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. तसेच नंदगड, लोंढा, चापगाव, बिडी, पारिश्वाड आदी गावांसह ग्रामीण भागात धूळवडीच्या दिवशीच रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा असल्याने शुक्रवार दि. 14 रोजी सकाळपासून रंगपंचमीला उधाण येणार आहे. तर खानापूर येथील रंगपंचमी बुधवार दि. 19 रोजी तर गुरुवार दि. 20 रोजी खानापूर चव्हाटा देवस्थानची यात्रा होणार आहे.
खानापूर शहरात प्रथेप्रमाणे बुधवारी रात्री जंगलातून होळी आणण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी विधिवत पूजन करून होळी उभारण्यात येणार आहे. रात्री लक्ष्मी गदगा मंदिरासमोरील जागेत मुख्य होली कामाण्णा दहन करण्यात येणार आहे. त्यानंतर चव्हाटा देवस्थान, ज्ञानेश्वर मंदिर, रवळनाथ देवस्थान, केंचापूर गल्लीतील त्रिनेत्र देवस्थान, अर्बन बँक चौक, स्टेशनरोडवरील ब्रम्हदेव मंदिरासमोर होलिका दहन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात प्रथेप्रमाणे धूळवडीदिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. तर खानापूर शहरात पंचमी दिवशी रंगपंचमी खेळली जाते. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 21 रोजी शहरातील निंगापूर गल्लीतील चव्हाटा देवस्थानची यात्रा होऊन होलिका उत्सवाची सांगता होते.
तालुक्याच्या पश्चिम भागात होळीउत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या भागातील उत्सवावर कोकणी संस्कृतीची छाप असून त्याप्रमाणेच होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये जांबोटी, कणकुंबी, हेम्माडगा, देगाव, पाली, गवाळी, मेंडील या गावात पाच दिवस रंगमाल खेळला जातो. यात पुरातन महाभारत आणि रामायणातील कथानके केली जातात. या सणावर गोवा आणि कोकणातील संस्कृतीची छाप असल्याने हा उत्सव परंपरेप्रमाणे उत्साहात ग्रामीण भागातील लोक साजरा करतात. कामानिमित्त आणि व्यवसायानिमित्त गोवा, महाराष्टासह इतर ठिकाणी असलेले चाकरमाणी होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात गावाकडे येतात. त्यामुळे गावात पुढील पाच दिवस उत्सवाचे वातावरण असणार आहे.
बालचमूंकडून होळीची तयारी सुरू
होळी सण म्हणजे धूळवडसह रंगांची मुक्त उधळण, या सणाची प्रत्येक वर्षी बालचमू अगदी आवर्जून वाट पाहतात. प्रत्येक गल्लीत होळी साजरी होत असल्याने बालकांचे अनेक गट सणाची तयारी करताना दिसतात. होळीनंतर लगेचच रंगपंचमी येत असल्याने रंगांची मुक्तउधळण करून आनंद लुटण्यासाठी सारेच आतुरलेले दिसत आहेत. शहरातील बाजारपेठेत विविध रंग, आणि साहित्याची दुकानदारांनी मांडणी केली आहे. पुढील पाच दिवस विविध भागात होलिकोत्सवनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
तालुक्यात होळी दरम्यान नाटक परंपरेमध्ये खंड
यापूर्वी तालुक्यात नाटकांची परंपरा मोठ्या प्रमाणात होती. अलीकडे काहीवर्षात या नाटक परंपरेत खंड पडलेला दिसून येत आहे. होळीपासून ते शिवजयंतीपर्यंत गावोगावी ग्रामीण कलाकार नाटकांची तालीम करून नाटक सादर करत होते. मात्र अलीकडे ही परंपरा बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. तसेच गोवा व इतर भागातून करमणुकीचे कार्यक्रम मागविण्यात येतात. तालुक्यात पश्चिम आणि पूर्व भागात होळीची पूर्णपणे परंपरा वेगवेगळी आहे. तरीही तालुक्यात होलिकोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.