हॉकी झारखंड कनिष्ठ महिला संघाला विजेतेपद
मध्यप्रदेश संघावर मात, हॉकी हरियाणा संघाला कांस्यपदक
वृत्तसंस्था/ रांची
चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये हॉकी झारखंडने अंतिम फेरीत हॉकी मध्यप्रदेशचा पराभव करून जेतेपद पटकावले. हॉकी हरियाणाने ओडिशा हॉकी संघटना संघाचा पराभव करून कांस्यपदक मिळविले.
अंतिम लढतीत झारखंड महिला संघाने मध्यप्रदेश महिला संघाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. स्वीटी डुंगडुगने 30 व्या, शांती कुमारीने 43 व निरु कुल्लूने 48 व्या मिनिटाला झारखंडचे गोल नोंदवले तर मध्यप्रदेशचा एकमेव गोल काजलने 45 व्या मिनिटाला नोंदवला. मध्यप्रदेशचा बचाव हा सर्वात भक्कम असल्याचे या स्पर्धेत दिसून आले होते. पण या लढतीत झारखंडने त्यांचा बचाव भेदून काढत तब्बल तीन गोल नोंदवले. उलट झारखंडनेच भक्कम बचाव करीत मध्यप्रदेशला केवळ एका गोलवर रोखण्यात यश मिळविले.
तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात हॉकी हरियाणाने ओडिशा हॉकी संघटनेचा पेनल्टू शूटआऊटमध्ये 2-1 असे हरविले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांत 2-2 अशी बरोबरी झाली होती. सेजलने पहिल्या मिनिटाला व शशी खासाने 36 व्या मिटिनाला हरियाणाचे गोल नोंदवले तर करुणा मिन्झने 53 व्या व प्रियांका कुजुरने 59 व्या मिनिटाला ओडिशाचे गोल केले. शूटआऊटमध्ये अमिशा एक्काने ओडिशाचा गोल नोंदवला तर रितिका व सेजल यांनी हरियाणाचे गोल नोंदवून कांस्यपदक निश्चित केले.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत हॉकी मध्यप्रदेशने शूटआऊटमध्ये ओडिशा हॉकी संघटनेचा 5-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी केली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी हरियाणावर 2-1 अशी मात करून अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. रोशनी आईंद व पार्वती टोपनो यांनी झारखंडचे गोल केले तर हरियाणाचा एकमेव गोल कर्णधार नंदनीने नोंदवला.