हॉकी इंडिया लीग लोगोचे अनावरण
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे 2024-25 ची हॉकी इंडिया लीग स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण गोनासिका संघाच्या फ्रांचायजींच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की उपस्थित होते.
हॉकी इंडियाच्या 2024-25 च्या लीग स्पर्धेत पुरुष विभागात 8 तर महिलांच्या विभागात 6 संघांचा समावेश राहिल. हॉकी इंडियाने पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये ही स्पर्धा महिलांसाठी घेण्याचा ठरविले आहे. 2017 च्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेमध्ये कलिंगा लान्सर्सने जेतेपद मिळविताना दबंग मुंबईचा पराभव केला होता. देशातील नवोदीत युवा हॉकीपटूंसाठी हॉकी इंडिया लीग स्पर्धा महत्त्वाची राहिल. यापूर्वी या स्पर्धेला प्रिमियर हॉकी लीग म्हणून ओळखले जात असे. पण त्यानंतर क्रिकेट प्रमाणेच या स्पर्धेचे नामकरण हॉकी इंडिया लीग म्हणून करण्यात आले.
28 डिसेंबरपासून हॉकी इंडिया लीगला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सामने रांची तसेच ओडीशातील राऊरकेला येथे खेळविले जाणार आहेत. महिलांची हॉकी लीग स्पर्धा रांचीत होणार असून ती 26 जानेवारीला समाप्त होईल. तर पुरुषांची हॉकी लीग स्पर्धेतील अंतिम सामना राऊरकेला येथे 1 फेब्रुवारी रोजी खेळविला जाईल. हॉकी इंडिया लीग स्पर्धेत विदेशी हॉकीपटूंचाही समावेश राहणार आहे.