For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकी फॉरवर्ड ललित उपाध्यायकडून निवृतीची घोषणा

06:39 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
हॉकी फॉरवर्ड ललित उपाध्यायकडून निवृतीची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अनुभवी भारतीय हॉकी फॉरवर्ड ललित उपाध्यायने त्यांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पडदा टाकला आहे. टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघांचा भाग राहिलेल्या ललितने दशकाहून अधिक काळाच्या प्रवासानंतर पूर्णविराम दिला आहे.

2014 च्या विश्वचषकात पदार्पण करण्यापासून ते दोनदा ऑलिंपिकच्या पदकविजेत्या संघाचा भाग राहण्यापर्यंत ललितची कारकीर्द आधुनिक काळातील भारतीय हॉकीच्या काही सर्वांत मोठ्या टप्प्यांची साक्षीदार राहिलेली आहे. टोकियो 2020 च्या ऑलिंपिकमध्ये इतिहास रचणाऱ्या संघाचा तो एक महत्त्वाचा भाग होता. त्यावेळी त्याने भारताला बहुप्रतिक्षित कांस्यपदक जिंकण्यास मदत केली आणि 2024 मधील पॅरिस गेम्समध्येही त्याने या कामगिरीची पुनरावृत्ती केली, यामुळे एक अव्वल खेळाडू म्हणून त्याची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली.

Advertisement

‘हा प्रवास एका छोट्या गावातून मर्यादित संसाधनांसह, पण अमर्याद स्वप्नांसह सुरू झाला’, असे ललितने एका हृदयस्पर्शी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपला निर्णय जाहीर करताना नमूद केले. रविवारी बेल्जियमविऊद्धच्या प्रो लीग 2024-25 च्या युरोपियन लेगमधील भारताच्या शेवटच्या सामन्यानंतर लगेचच त्याने हा निर्णय जाहीर केला. ‘स्टिंग ऑपरेशनला तोंड देण्यापासून एकदा नव्हे, तर दोनदा ऑलिंपिक पदक प्राप्त करण्यापर्यंतचा हा मार्ग आव्हाने, वाढ आणि अविस्मरणीय अभिमानाने भरलेला राहिला’, असे ललितने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गोल करण्याचे विलक्षण कौशल्य असलेला ललित वरिष्ठ स्तरावर भारतासाठी 183 सामने खेळला आणि त्यात त्याने 67 गोल केले. गेल्या काही वर्षांत तो भारताच्या फॉरवर्ड लाईनमध्ये एक विश्वासार्ह नाव बनला. तो त्याच्या प्रतिभेसाठी, मैदानावरील बुद्धिमत्तेसाठी आणि अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही शांत वर्तनासाठी ओळखला गेला. या 31 वर्षीय हॉकीपटूचा भारतीय जर्सीमधील शेवटचा सामना 15 जून रोजी ऑस्ट्रेलियाविऊद्ध झाला. ललितच्या योगदानाबद्दल बोलताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले की, ललित हा त्याच्या पिढीतील सर्वांत सुंदर आणि समर्पित आघाडीपटूंपैकी एक राहिलेला आहे.

Advertisement
Tags :

.