कर्णकर्कशता, धिंगाणा नाही चालणार
बारानंतर जप्त होणार वाजणारे लाऊडस्पीकर : नरकासुराच्या निमित्ताने पोलिसांचा इशारा
पणजी : ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी रात्री 10 वाजल्यानंतर लाऊडस्पीकर बंद करणे बंधनकारक आहे. त्यात सणानिमित्त रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असली तरीही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून राज्यात रात्री उशिरापर्यंत नरकासूर स्पर्धांचे आयोजन करण्याचे काही संस्था ठरवत आहेत. तशा प्रकारची जाहिरातही करीत आहे. अशा संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिला आहे. नियमांच्या चौकटीत राहूनच कार्यक्रम साजरे करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही वालसन यांनी बजावले आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असल्याने अधिकाधिक पोलीस बंदोबस्ताच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे 9 नोव्हेंबरनंतर प्रत्येक पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांची सभा घेतली जाईल. त्यांना वेळ आणि नियमांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.
... तर 100 नंबरवर फोन करा
नरकासूराच्या रात्री ठिकठिकाणी पोलिसांच्या गस्ती असतीलच, मात्र ज्या ठिकाणी पोलीस पोचणार नाहीत आणि अशा ठिकाणी कुणी वेळेचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असल्यास त्वरित 100 नंबरवर फोन करा. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करतील, असेही वालसन यांनी स्पष्ट केले आहे.
रात्रीपासून पहाटेपर्यंत चालतो धिंगाणा
राज्यात दिवाळी पेक्षा नरसासूरालाच अधिक महत्त्व देऊन संपूर्ण रात्रभर धिंगाणा घातला जातो. विविध संस्था नरकासूर स्पर्धांचे आयोजन करून पहाटेपर्यंत धिंगाणा घालण्यास प्रोत्साहन देतात. अनेक कुटुंबेही दिवाळीदिवशी नातेवाईकांच्या घरी जाऊन सण साजरा करणार नाही, पण नरकासुराच्यानिमत्ताने मात्र रात्रभर दुचाकी, कारमधून फिरत असतात. त्यावेळी धोकाही असतो. दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या सणाला मात्र झोपून राहतात.
नरकासुराच्या निमित्ताने होतात अनेक गैरप्रकार
- निर्माण होतात अनेक समस्या
- मद्यपानामुळे अनेकजण बेहोश होतात
- मद्यपान करुन वाहने चालवितात
- दारुच्या बाटल्या रस्त्यांवर फोडल्या जातात
- अनेकठिकाणी होते वाहतूक कोंडी
- वयस्कर, आजारी माणसांना आवाजाचा त्रास
- मद्याच्या नशेत क्षुल्लक कारणावरून होतात भांडणे