हिजबुल्लाह कमांडर सलीमचा खात्मा
सीरियामध्ये इस्रायलचे हवाई हल्ले : लेबनॉन पंतप्रधानांचा मारेकरी
वृत्तसंस्था/ दमास्कस
इस्रायलच्या सैन्याने हिजबुल्लाहचा कमांडर सलीम जमील अय्याशला एका हवाई हल्ल्याद्वारे ठार केले आहे. सलीम हा सीरियातील हिजबुल्लाहचा बालेकिल्ला अल-कौसैरमध्ये लपून बसला होता, इस्रायल सैन्याच्या हल्ल्यात सलीमसोबत आणखी 8 जण मारले गेले आहेत. इस्रायलच्या या कारवाईवर इराणच्या विदेश मंत्रालयाने टीका केली आहे. तसेच इस्रायलची संयुक्त राष्ट्रसंघातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
सलीम हा हिजबुल्लाहच्या युनिट 151 चा सदस्य होता. अमेरिकेने त्याचवर 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम घोषित पेले होते. लेबनॉनचे पंतप्रधान रफीक हरीरी यांच्या हत्येसाठी सलीम जबाबदार होता. हरीरी हे लेबनॉनचे सर्वात लोकप्रिय सुन्नी मुस्लीम नेते होते. हरीरी हे 5 वेळा देशाचे पंतप्रधान राहिले होते.
14 फेब्रुवारी 2005 रोजी बैरूतमध्ये हरीरी यांच्या वाहनताफ्याला 3 हजार किलो विस्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली होती. यानंतर झालेल्या भीषण स्फोटात हरीरी यांच्यासोबत 21 जणांचा मृत्यू झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने हरीरी यांच्या मृत्यूनंतर स्पेशल ट्रिब्युनल फॉर लेबनॉनची स्थापना केली होती. या लवादाने 2022 मध्ये सलीम समवेत 3 जणांना हरीरी यांच्या हत्येसाठी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पंतप्रधान हरीरी यांची हत्या घडवून आणणाऱ्या आत्मघाती पथकाचे नेतृत्व अय्याशनेच केले होते. यात त्याच्यासोबत हसन हबीब मेरही आणि हुसैन हसन ओनैसी सामील होते असे लवादाने म्हटले होते. हरीरी यांच्या हत्येनंतर तिन्ही गुन्हेगारांनी पलायन पेले होते. तर तत्कालीन हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहने या तिन्ही गुन्हेगारांना सोपविण्यास नकार दिला होता.
हरीरी यांनी इस्रायलसोबत चांगले संबंध प्रस्थापित पेले होते. इस्रायलसोबत चर्चा करून दक्षिण लेबनॉनवर त्यांनी पुन्हा नियंत्रण मिळविले होते. या भूभागावर इस्रायलने 18 वर्षांपर्यंत कब्जा केला होता. हरीरी यांनी इस्रायलसोबत जवळीक साधल्यानेच हिजबुल्लाहने त्यांची हत्या घडवून आणली होती.