हिजबुल्लाची नरमाई, शस्त्रसंधीस तयार
गाझाची अटही घेतली मागे, इस्रायलला आवाहन
वृत्तसंस्था / बैरुट
इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे प्रचंड हानी सोसावी लागलेली हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना आता नरमाईच्या भूमिकेत आली आहे. या संघटनेचे अनेक नेते मारले गेले असून तिची सशस्त्र संघर्ष करण्याची क्षमताही आता बरीच कमी झाली आहे. या घडामोडींमुळे ही संघटना आता जेरीस आल्याचे दिसून येत असून तिने इस्रालयशी विनाअट शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविली आहे.
इस्रालयच्या सेनेने हिजबुल्लाच्या भूमीत प्रवेश केला असून गेल्या दोन आठवड्यांपासून हिजबुल्लाच्या अनेक स्थानांवर नियंत्रण मिळविले आहे. दक्षिण लेबेनॉनचा काही भूभाग इस्रायलच्या सेनेने आपल्या ताब्यात घेतल्याने, तसेच या संघटनेचे अनेक शस्त्रसाठे आणि अग्निबाण प्रक्षेपक उद्ध्वस्त केल्याने हिजबुल्लाच्या हल्ला करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाल्याचे तज्ञांचे मत आहे.
शस्त्रसंधीची हाक
इस्रालयशी शस्त्रसंधी करण्यास आम्ही तयार आहोत. आमच्या बाजूने आम्ही कोणतीही अट घातलेली नाही. या भागात शांतता नांदावी आणि सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. इस्रायलने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन या संघटनेच्या नेत्यांनी इस्रायलला केले आहे.
इस्रायलचे हल्ले सुरुच
इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुत आणि दक्षिण लेबेनॉनच्या हिजबुल्ला प्रभावित भागांवरील वायुहल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. लक्षावधी नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. यामुळे शेजारच्या सिरीया देशात स्थलांतरितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तेथील नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे, असे तज्ञांचे मत आहे. आता हिजबुल्लाला शस्त्रसंधीचे आवाहन करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. तथापि, इस्रायल अशा शस्त्रसंधीला मान्यता देईल काय असा प्रश्न निर्माण झाला असून त्याचे उत्तर येत्या काही काळात मिळणार आहे. हिजबुल्लाचा नायनाट होईपर्यंत संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे. तथापि, आता इराणकडून हिजबुल्लाला मिळणाऱ्या सहाय्याचा ओघ मंदावल्याने हिजबुल्ला संघटनेची मारक शक्ती कमी झाली आहे.
अमेरिका, अरब देशांमध्ये चर्चा
मध्यपूर्वेतील संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिका आणि अरब देशांनी गुप्त चर्चासत्रे चालविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या सुरु असणाऱ्या संघर्षाची व्याप्ती वाढल्यास विश्वयुद्धाचा धोका नाकारता येणार नाही. असे युद्ध साऱ्या जगासाठी संकट ठरणार असल्याने हा संघर्ष नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. अनेक अरब देशही संघर्ष थांबविण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे इराण हा देशही आता एकाकी पडत चालल्याचे दिसून येते. या देशाचे अनेक नेते स्वत:च्या संरक्षणासाठी भूमिगत झाल्याचेही वृत्त आहे. सध्या इराणनेही आपली नेहमीची आक्रमक भाषा सौम्य केल्याचे निदर्शनास येत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाण्याची शक्यता आहे.
गाझामध्ये अपरिमित हानी
गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी हल्ला चढविल्यानंतर इस्रायल आणि हमास संघर्षाला प्रारंभ झाला. गेले वर्षभर सतत हा संघर्ष होत असून यात गाझापट्टी आणि हमास यांची प्रचंड हानी झाली आहे. गाझापट्टीतील साठ टक्के इमारती नष्ट झाल्या आहेत. किमान 40 हजार ते 50 हजार नागरिक प्राणास मुकले आहेत. गाझा पट्टीची पुनर्बांधणी करण्यासाठी किमान 80 ते 100 वर्षे लागतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हमासचेही असंख्य नेते या संघर्षात मारले गेले असल्याची माहिती आहे.