For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिजबुल्लाह प्रमुख नसराल्लाहचा खात्मा

06:58 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिजबुल्लाह प्रमुख नसराल्लाहचा खात्मा
Advertisement

इस्रायलचे लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले :  राजधानी बेरूतमध्ये एकामागून एक बॉम्बवर्षाव

Advertisement

वृत्तसंस्था/ बेरूत, जेरुसलेम

इस्रायली हवाई दलाने शुक्रवारी रात्री लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. ‘ऑपरेशन न्यू ऑर्डर’चा भाग म्हणून हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाहला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नसराल्लाह मारला गेल्याचा दावा सर्वप्रथम इस्रायलने केला. त्यानंतर हिजबुल्लाकडून सुरुवातीला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र, सुमारे 20 तासांनंतर हिजबुल्लाहने याची पुष्टी केल्याने नसराल्लाहचा खात्मा झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Advertisement

इस्रायली सैन्याने 27 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजल्यानंतर लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हवाई हल्ला केला. हल्ल्यावेळी नसराल्लाह कमांड सेंटरमध्ये असल्याने त्याचा मृत्यू झाल्याने पश्चिम आशियातील तणावात भर पडली आहे. हल्ल्यानंतर शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इस्रायली लष्कराने नसराल्लाहच्या मृत्यूचा दावा केला. आयडीएफने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंबंधी माहिती देताना ‘जगाला आता नसरल्लाहपासून घाबरण्याची गरज नाही. तो दहशत पसरवू शकणार नाही.’ असे जाहीर केले. दरम्यान, नसराल्लाहच्या हत्येनंतर मध्य-पूर्वेत तणाव वाढला असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आल्याचे समजते. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाबाबत गोपनीयता पाळण्यात येत असून त्यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे.

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील लढा दिवसेंदिवस उग्र बनत चालला असून लेबनॉनमधील सामान्य जनताही त्याची किंमत चुकवावी लागत आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री उशिरा इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये एकामागून एक अनेक हवाई हल्ले केले. युएनजीसीमध्ये नेतान्याहू यांच्या भाषणानंतर हा हल्ला झाला. लेबनॉनमध्ये इस्रायलचा हा सर्वात गंभीर हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यानंतर आकाशात धुराचे ढग दिसून येत होते. इस्रायली मीडियानुसार, हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर 80 हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले होते, जिथे संघटनेचा प्रमुख नसरल्लाह मारला गेला होता. प्रत्येक बॉम्बवर सरासरी एक टन स्फोटके होती. यात बंकरपर्यंत घुसणाऱ्या बॉम्बचाही वापर करण्यात आला.

हिजबुल्लाहने इस्रायलवर डागली 50 रॉकेट

न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, नसराल्लाहच्या मृत्यूची पुष्टी केल्यानंतर हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर 50 रॉकेट्सचा मारा केला. याआधी शुक्रवारी रात्रीही इस्रायलच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर 65 रॉकेट डागली होती. या प्रतिहल्ल्यामध्ये काही लोक जखमी झाले असले तरी मोठ्या जीवितहानीचे वृत्त नाही.

अमेरिकेला पूर्वकल्पना

हल्ल्यापूर्वी इस्रायलने अमेरिकेलाही याची माहिती दिली होती. या हल्ल्यांमध्ये सहा इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. या हल्ल्यात नेमकी किती जीवितहानी झाली यासंबंधीची माहिती जारी करण्यात आलेली नाही. इस्रायलने बेरूतमधील हिजबुल्लाहच्या मुख्यालयावरही हल्ला केला. हे मुख्यालय रियाशी इमारतीखाली होते. त्यात हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्लाहने बंकर बांधल्याचे सांगितले जात आहे.

इराणने बोलावली ‘ओआयसी’ची बैठक

दरम्यान, इराणने लेबनॉन आणि पॅलेस्टाईनमधील इस्रायली हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या (ओआयसी) सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली. ओआयसी ही चार खंडांमध्ये पसरलेल्या 57 मुस्लीम देशांची संघटना आहे. संयुक्त राष्ट्र संघानंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी संस्था आहे. एकप्रकारे ओआयसीकडे मुस्लीम आणि इस्लामिक देशांचा आवाज म्हणून पाहिले जाते. या संघटनेची स्थापनाही इस्रायलशी जोडलेली आहे.

इराणच्या विमानाने घेतला यू-टर्न

तेहरानहून लेबनॉन किंवा सीरियाला जाणाऱ्या इराणी केशम फार्स एअरच्या फ्लाईटने शनिवारी सकाळी इराकी एअरस्पेसमध्ये यू-टर्न घेतल्याचे फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईटवर निदर्शनास आले. हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. लेबनॉनचे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक मंत्री अली हमिया यांनीही याला दुजोरा दिला. त्यांनी इराणी विमानाला बेरूतच्या विमानतळावर उतरण्याची आणि लेबनीजच्या हवाई हद्दीत प्रवेश न करण्याची सूचना दिली. इराणचे विमान लेबनॉनमध्ये उतरल्यास बळाचा वापर केला जाईल, असा इशारा देण्यात आल्याचे समजते.

इस्रायलची क्रूरता उघड : इराण

लेबनॉनमधील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात खामेनी यांनी लेबनॉनमधील हल्ल्याने इस्रायलची क्रूरता उघड होत असल्याचे वक्तव्य केले. इस्रायलने नि:शस्त्र लोकांना लक्ष्य करून आपले क्रौर्य दाखवले आहे. इस्रायलचे हे धोरण मूर्खपणाचे आहे. गाझा युद्धातून इस्रायलने कोणताही धडा घेतला नाही, असेही खामेनी म्हणाले. हिजबुल्लाहच्या तुलनेत इस्रायल खूपच लहान आहे. आम्ही लेबनॉनच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असेही खामेनी यांनी स्पष्ट केले.

नेतान्याहू परतले इस्रायलला

लेबनॉनमधील बॉम्बहल्ल्यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू शुक्रवारी संयुक्त राष्ट्रात उपस्थित राहण्यासाठी आले होते. तेथे त्यांनी भाषणही केले. त्यानंतर ते शनिवारी इस्रायलला परतले आहेत. तत्पूर्वी, नेतान्याहू यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रात भाषण दिल्यानंतर आपल्या हॉटेलमधून हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हल्ला करण्याची परवानगी दिली. हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने नेतान्याहू यांचे छायाचित्र जारी केले असून त्यामध्ये ते लँडलाईन फोनवरून लेबनॉनमध्ये हल्ल्याचे आदेश देताना दिसत आहेत.

हसन नसराल्लाहच्या कन्येचाही मृत्यू

हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह यांची मुलगी झैनब नसराल्लाह हिच्या मृत्यूची बातमीही समोर आली आहे. शुक्रवारी दक्षिण बेरूतमधील हिजबुल्लाहच्या स्थानांना लक्ष्य केलेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात झैनब मारली गेली. द जेऊसलेम पोस्टने इस्रायलच्या चॅनल 12 च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, हिजबुल्लाह किंवा लेबनीजच्या कोणत्याही अधिकृत सूत्रांनी या घटनेला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

बेरूतमधील लोकांना घरे सोडण्याची सूचना

इस्रायली सैन्याने बेरूतच्या अल-बाराजनेह आणि अल-हदाथ परिसरातील रहिवाशांना ताबडतोब त्यांची घरे सोडण्याचे आणि 500 मीटरपेक्षा जास्त दूर जाण्याचे आदेश दिले आहेत. हिजबुल्लाहवर इस्रायली हल्ले सुरूच असल्यामुळे  सुरक्षिततेसाठी तुम्ही ताबडतोब इमारती रिकामी कराव्यात, असे इस्रायली सैन्याचे अरबी भाषेतील प्रवक्ते अविचाई अद्राई यांनी सांगितले. इस्रायली हल्ल्यांच्या वाढत्या धोक्मयांदरम्यान हा आदेश देण्यात आला आहे.

क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर, डेप्युटीही ठार : आयडीएफ

दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर मोहम्मद अली इस्माईल आणि त्याचा उपप्रमुख हुसेन अहमद इस्माईल हे दोघेजण इस्रायल एअर फोर्सच्या अचूक हल्ल्यात ठार झाले. अली इस्माईल इस्रायलच्या विरोधात अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार होता. इस्रायली प्रदेशात रॉकेट डागणे आणि  मध्य इस्रायलच्या दिशेने पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात त्याचा सहभाग होता. याआधी हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट फोर्सचा प्रमुख इब्राहिम मुहम्मद काबिसी आणि या युनिटच्या इतर वरिष्ठ कमांडरचाही खात्मा करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.