हिटमॅन इज बॅक!
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत 90 चेंडूत 119 धावांची खेळी : रोहितला अखेर सूर गवसला : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
गेल्या काही महिन्यांपासून सतत अपयशाला तोंड देत असलेल्या भारतीय कर्णधाराने अखेर आपला जुना फॉर्म दाखवला. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी केली आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर शानदार शतक झळकावले. रोहितचे शतक, गिलची अर्धशतकी खेळी तर जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 304 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर भारताने विजयासाठीचे लक्ष्य 44.3 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील तिसरा व औपचारिक सामना दि. 12 रोजी अहमदाबाद येथे होईल.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने 136 धावांची सलामी दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीच्या फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. पण कटकमधील दुसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडताना आपल्या टीकाकारांची बोलती बंद केली. रोहितने वनडेतील 32 वे शतक साजरे करतान 90 चेंडूत 12 चौकार व 7 षटकारासह 119 धावांची वादळी खेळी साकारली. त्याला गिलने 52 चेंडूत 60 धावा करत चांगली साथ दिली. रोहित व गिलने शानदार सुरुवात करत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला.
श्रेयस अय्यर, अक्षर पटेलची फटकेबाजी
शतकानंतर आक्रमक खेळणाऱ्या रोहितला लिव्हिंगस्टोनने बाद केले तर गिलचा अडथळा ओव्हर्टनने दूर केला. दरम्यान, दिग्गज फलंदाज विराट कोहली मात्र 5 धावा काढून स्वस्तात परतला. त्याचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. विराट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने 47 चेंडूत 44 धावांची वादळी खेळी केली. आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. यानंतर केएल राहुल (10), हार्दिक पंड्या (10) मात्र स्वस्तात माघारी परतले. दुसरीकडे, अक्षर पटेलने मात्र संयमी खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याने 4 चौकारासह 41 धावा केल्या. जडेजा 11 धावांवर नाबाद राहिला.
बारबत्ती क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बटलरचा हा निर्णय सलामीवीर फिल सॉल्ट व बेन डकेट यांनी सार्थ ठरवताना 10 षटकांत 81 धावा फटकावल्या. वनडेत पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सॉल्टला (26) बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. डकेटने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 56 चेंडूत 10 चौकारासह 65 धावा केल्या. डकेटचा अडथळा जडेजाने दूर केला.
रुटची अर्धशतकी खेळी
सलामीची जोडी बाद झाल्यानंतर अनुभवी जो रुटने सर्वाधिक 6 चौकारासह 69 धावांची खेळी साकारली. त्याला हॅरी ब्रुक 31 व कर्णधार जोस बटलरने 34 धावा करत चांगली साथ दिली. रुट बाद झाल्यानंतर लिव्हिंगस्टोनने 41 धावांची आक्रमक खेळी केली. पण, तळाच्या फलंदाजांना मात्र अपेक्षित खेळी करता आली नाही. लिव्हिंगस्टोनने अखेरच्या टप्प्यात आक्रमक खेळी केल्यामुळे इंग्लिश संघाला तीनशेचा टप्पा गाठता आला. दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाची फिरकी चांगलीच चालली. त्याने बेन डकेट, जो रूट व ओव्हर्टन या तीन महत्त्वाच्या विकेट काढल्या.
संक्षिप्त धावफलक
49.5 षटकांत सर्वबाद 304 (फिल सॉल्ट 26, बेन डकेट 65, जो रुट 69, हॅरी ब्रुक 31, जोस बटलर 34, लिव्हिंगस्टोन 41, रविंद्र जडेजा 3 बळी, शमाहृ हर्षित राणा, हार्दिक पंड्या व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी 1 बळी)
भारत 44.3 षटकांत 6 बाद 308 (रोहित शर्मा 119, शुभमन गिल 60, विराट कोहली 5, श्रेयस अय्यर 44, अक्षर पटेल नाबाद 41, जडेजा नाबाद 11, ओव्हर्टन 2 बळी, लिव्हिंगस्टोन, रशीद व अॅटकिन्सन प्रत्येकी एक बळी).
वरुण चक्रवर्तीचे वनडेत पदार्पण
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला मोठ्या प्रतिक्षेनंतर वनडेत पदार्पणाची संधी मिळाली. कटकमधील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी वरुण चक्रवर्तीचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वरुणचा हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आहे. दरम्यान, कुलदीप यादवला विश्रांती दिली असून वरूण चक्रवर्ती भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे. रवींद्र जडेजाने त्याला डेब्यू कॅप दिली.
सिक्सर किंग रोहित शर्मा! ख्रिस गेलला टाकले मागे
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने तुफानी खेळी साकारताना 90 चेंडूत 119 धावांची वादळी खेळी साकारली. आपल्या खेळीत त्याने 12 चौकार व 7 षटकार लगावले. या दरम्यान, रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले आहे. गेलच्या नावावर 331 षटकार होते. तर रोहितने या सामन्यात 7 षटकार मारून गेलचा विक्रम मोडला. आता रोहित 338 षटकारांसह वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
- शाहिद आफ्रिदी - 351 षटकार
- रोहित शर्मा - 338 षटकार
- ख्रिस गेल - 331 षटकार
- सनथ जयसुर्या - 270 षटकार
वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारा तिसरा खेळाडू
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील 32 वे शतक झळकावले. या शतकासाठी त्याने 90 चेंडूंचा सामना करत 119 धावा केल्या. या खेळीक्र रोहितने रिकी पाँटिंगला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत आता सचिन तेंडुलकर (49 शतके) आणि विराट कोहली (50 शतके) यांच्यानंतर रोहित शर्मा (32 शतके) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
विराट कोहली - 50 शतके
सचिन तेंडुलकर - 49 शतके
रोहित शर्मा - 32 शतके
रिकी पाँटिंग - 30 शतके