हितेश गुलियाला मुष्ठियुद्ध स्पर्धेत सुवर्ण
विश्वचषक मुष्ठियुद्ध स्पर्धा : भारताला सहा पदके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व मुष्ठियुद्ध फेडरेशनच्या ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक मुष्ठियुद्ध स्पर्धेत भारताने एकूण 6 पदकांची कमाई केली. हितेश गुलियाने भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेमध्ये अभिनाश जमवालने रौप्यपदक तर अन्य चार भारतीय मुष्ठियोद्ध्यांनी 4 कांस्यपदके मिळवली.
विश्व मुष्ठियुद्ध फेडरेशनतर्फे ही पहिलीच इलाईट स्तरावरील आंतरराष्ट्रीय मुष्ठियुद्ध स्पर्धा भरवली गेली होती. या स्पर्धेत पुरुषांच्या 70 किलो वजन गटातील अंतिम लढत भारताचा हितेश गुलिया आणि इंग्लंडचा ओडेल कॅमेरा यांच्यात आयोजित केली होती. पण दुखापतीमुळे कॅमेराने अंतिम फेरीपूर्वीच स्पर्धेतून माघार घेतल्याने हितेश गुलियाला सुवर्णपदकाचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेत पुरुषांच्या 65 किला वजनी गटात भारताच्या अभिनाश जमवालने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. अंतिम फेरीत ब्राझीलच्या युरी रेसने जमवालचा तांत्रिक गुणावर पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे जमवालला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत पुरुषांच्या 50 किलो वजन गटात भारताच्या एम. जादुमणी सिंगने, 55 किलो वजनी गटात मनीष राठोडने, 60 किलो वजन गटात सचिनने तर 90 किलो वजन गटात विशालने प्रत्येकी 1 कांस्यपदक मिळविले. ब्राझीलची हि स्पर्धा सुरु होण्यापूर्वी हितेश गुलियाकरीता आयोजित केलेले 10 दिवसांचे सरावाचे शिबिर खूपच उपयोगी पडले. या शिबिरामुळे भारतीय मुष्ठियोद्ध्यांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण 6 पदकांची कमाई केली. या स्पर्धेसाठी 10 जणांचा भारतीय संघ सहभागी झाला होता. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतरची ही पहिली प्रमुख आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होती. आता 2028 साली होणाऱ्या लॉज एंजेल्स ऑलिम्पिक स्पर्धेकरीता भारतीय मुष्ठियोद्ध्यांच्या पूर्वतयारीला आतापासूनच जोरदार प्रारंभ सुरु झाला आहे.