हिट-अँड-रन
दिग्गज मॅराथॉन रनर फौजा सिंह यांचे अलिकडेच एका हिट अँड रन दुर्घटनेत निधन झाले. 2022 मध्ये भारतात अशाप्रकारच्या दुर्घटनांमध्ये 30,400 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. परंतु लोक दुर्घटनेस कारणीभूत ठरल्यावर पीडिताला तेथेच सोडून देत पळ का काढतात? पोलीसही चौकशीपासून वाचण्यासाठी दुर्घटनांना हिट-अँड-रन केस का करतात? भारतात हिट-अँड-रनच्या प्रकरणांची संख्या कमी केली जाऊ शकते का या प्रश्नांचा उहापोह करणे आवश्यक ठरले आहे. बहुतांश हिट-अँड-रन प्रकरणांचा तपास कधीच केला जात नाही आणि पीडित परिवारांना यामागील उत्तरही मिळत नाही. 114 वर्षीय रनरच्या मृत्यूवर प्रसारमाध्यमांचे लक्ष असल्याने पोलिसांना कारवाई करणे भाग पडले, पोलिसांनी संबंधित चालकाला अटक केली, जो कॅनडातून परतलेला एक युवक होता.
भारत हिट अँड रनची कॅपिटल कसा ठरला?
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत रस्ते दुर्घटनांमध्ये होणारे 49 टक्के मृत्यू हे हिट अँड रनच्या प्रकरणांमधील असतात. भारत जगभरात रस्ते दुर्घटनांमधील बळींप्रकरणी पहिल्या स्थानावर आहे. तसेच भारतात सर्वाधिक लोक हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये जीव गमावतात. अशा प्रकरणांमध्ये चालक पीडितांना मदत करण्याचा प्रयत्न न करताच घटनास्थळावरून फरार होतो. एनसीआरबीच्या नव्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारतात अशाप्रकारच्या दुर्घटनांमध्ये 30,400 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. 2022 चा आकडा 2021 च्या तुलनेत 17 टक्क्यांनी अधिक आहे. शासकीय आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारतात एकाचवर्षात रस्ते दुर्घटनांमध्ये 1.68 लाखाहून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.
व्हीआयपी कल्चर, एसयूव्ही मेंटॅलिटी
बेजबाबदार चालक, पायी चालणारे लोक आणि दुचाकीस्वारांपासून खराब रस्ते डिझाइन, पायाभूत सुविधांची कमतरता आणि जवळपास झिरो-कायदे नियमापर्यंत तज्ञांनी अशा डेडली कॉकटेलचा खुलासा केला आहे, जो भारताला हिट-अँड-रन कॅपिटलमध्ये बदलत आहे. ‘एसयूव्ही मेंटॅलिटी’, व्हीआयपी कल्चर आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे अशाप्रकारच्या लोकांना अधिक हिंमत मिळते असे त्यांचे सांगणे आहे.
भारतात रस्ते दुर्घटनांची फॉरेन्सिक तपासणी होणे दुर्लभच आहे, त्या क्षणी प्रत्यक्षात काय घडले हे जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही आणि नेहमी चालकालाच दोषी ठरविले जाते. अशावेळी वर्तन केवळ दोष माथी मारण्याचा असतो, पूर्ण तपासानंतर उत्तरदायित्व निश्चित करत जीवित-वित्तीय हानी कमी करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जाते. भारतात दुर्घटनांच्या प्रकरणामध्ये नेहमीच मोठ्या लोकांनाच दोषी ठरविले जाते.
दुर्घटनांचे खरे कारण जाणण्याचा प्रयत्न नाही
एखाद्या खड्डयामुळे चालकाने गाडी वळविली आणि दुचाकीस्वाराला टक्कर दिली का? एखादा मुलगा बॉलचा पाठलाग करत रस्त्यावर धावत होता का? भटक्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्ना चालकाने नियंत्रण गमावले का? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. कारण कुणी हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही पोलीस स्वत: चौकशीच्या कटकटीपासून वाचण्यासाठी दुर्घटनांना हिट-अँड-रनच्या स्वरुपात नोंद करतात आणि कधी आरोपी सापडल्यास आर्थिक व्यवहार होतात आणि मृतांचे कुटुंबीय न्यायासाठी तळमळत राहतात.
हिट-अँड-रन प्रकरण ‘ड्राय केस’ का?
हिट-अँड-रन दुर्घटनांच्या प्रकरणांना पोलिसांच्या भाषेत ‘ड्राय केस’ म्हटले जाते, कारण यात कुठलाही पैसा कमाविला जाऊ शकत नाही असे दिल्लीत वाहतूक अन् तपासाचे व्यवस्थापन पाहिलेल्या एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वत:चे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. पोलीस प्रकरणाच्या पुढील तपासाला टाळण्यासाठी हिट-अँड-रनच्या स्वरुपात वर्गीकृत करतात असेही या अधिकाऱ्याने मान्य केले. अशा प्रकरणांमधील गुन्हेगाराचा शोध लागल्यास ते गुन्हेगारांना वाचविणे आणि पैसे कमाविण्यासाठी तक्रारदार किंवा पीडिताच्या परिवाराला प्रकरण पुढे नेण्यापासून रोखत असल्याचे कबुली या अधिकाऱ्याने दिली आहे. नियम-कायदे लागू करण्याचे प्रकरण जवळपास शून्य आहे आणि कायद्याबद्दलचा धाकही नसल्याने भारतात हिट-अँड-रनच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
दुर्घटनेनंतर चालक पळ का काढतो?
कायद्याची भीती नसणे, चालकांमध्ये कायदेशीर जबाबदारीविषयी जागरुकतेचा अभाव, कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकण्याची भीती, रोड युजर्सबद्दल बेजबाबदारपणा, व्हीआयपी संस्कृती, तसेच स्थानिक लोकांकडून मारहाण होण्याच्या भीतीमुळे दुर्घटनेनंतर चालक पळ काढत असतात असा दावा रस्तेसुरक्षा तज्ञ रोहित बलूजा यांनी केला आहे. बलूजा हे फॉरेन्सिक तपासात कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतात. योग्य वाहन परवाना नसणे, वय कमी असणे, मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालविणे यासारखे कारणही चालकांना दुर्घटनास्थळांवरून पळ काढण्यास भाग पाडतात.
मॉब लिंचिंगची भीती
स्थानिक लोक किंवा दुर्घटनास्थळावर असलेल्या गर्दीकडून हल्ला होण्याची भीती ही भारतात वस्तुस्थिती आहे. भारतात गर्दीची मानसिकता वरचढ असल्याने पीडिताला मदत करण्याची इच्छा असूनही चालक पळ काढत असल्याचे दिसून आले आहे. गर्दीयुक्त भागांमधून चालक जमावाचा हल्ला आणि हिंसेच्या भीतीने पळ काढतो. कायदेशीर पैलूंची माहिती नसल्याने ते दुर्घटनेनंतर गर्दीयुक्त भागांमधून पळून जातात. लोक अपेक्षेच्या तुलनेत नव्या गुड समॅरिटन लॉपासून अनभिज्ञ आहेत. मोटर वाहन अधिनियम 1988 चे कलम 134 हे दुर्घटनांमध्ये सामील वाहनचालक आणि अन्य जबाबदारांच्या कर्तव्याला नमूद करणारे असून यात ‘जमावाच्या संतापा’चाही उल्लेख असल्याची माहिती एनआयटी त्रिचीत रस्ते सुरक्षा आणि वाहतूक इंजिनियरिंगचे तज्ञ, सहाय्यक प्राध्यापक ऋत्विक चौहान यांनी दिली.
पीडितांना मदत करणे आवश्यक
भारतीय न्याय संहितेचे कलम 106 हे अशा व्यक्तींदरम्यान फरक करते, जो भरधाव वेग किंवा बेजबाबदारपणामुळे एखाद्याच्या मृत्यूचे कारण ठरतो आणि याची पोलिसांना कल्पना देतो आणि घटनेनंतर पोलीस किंवा मॅजिस्ट्रेटला न कळविता पळ काढतो. अशा जीवघेण्या दुर्घटनांचे कारण ठरणारा आणि त्याची माहिती कळविणाऱ्याला कमाल 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, तर हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये सामील चालकांसाठी शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रकचालकांच्या विरोधानंतर बीएनएसचे हे कलम स्थगित करण्यात आले आहे. पूर्वी भादंविमध्ये हिट-अँड-रन प्रकरणांना हाताळण्यासाठी कुठलाही विशेष कायदा नव्हता. दुर्घटनांमध्ये सामील चालक एखाद्या धोक्यामुळे घटनास्थळ सोडत असल्यास त्याने नजीकच्या पोलीस स्थानकात हजर व्हावे अशी सूचना तज्ञांकडून करण्यात आली आहे.
वाहतूक देखरेखीचा अभाव, खराब रस्ते डिझाइन
हिट-अँड-रनच्या घटना या अनेक अपयशांमुळे घडत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. भारतात जॉगिंग करणे, सायकल चालविणे, रस्ता ओलांडणे जोखिमीचे आहे. उत्तम रस्ते डिझाइन दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यास मोठी भूमिका बजावू शकतात. भारतात रस्ते वाहनचालकांना विचारात घेत तयार केले जातात, यात पायी चालणारे किंवा सायकलचालकांचा फारसा विचार केला जात नाही. रस्ते दुर्घटनांसाठी मुख्यत्वे तीन कारणं असतात, यात चालकाची चूक, रोड युजर्सची चूक आणि रस्त्याची स्थिती सामील आहे. योग्य प्रकाश आणि साइन आणि मार्किंग नसणेही रस्ते दुर्घटनांचे कारण आहे. रोड सरफेसची स्थिती, उदाहरणार्थ ख•dयांमुळे दरवर्षी हजारो दुर्घटना घडत असतात.
प्रशिक्षणाचा अभाव
पोलिसांना दुर्घटनांच्या फॉरेन्सिक तपासणीकरता प्रशिक्षित केले जात नाही. वाहनांचे पडलेले तुकडे उदाहरणार्थ हेडलाइटची काच, उखडलेला रंग इत्यादीचा वापर दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. टायरच्या खुणा दुर्घटनेदरम्यान चालकाच्या वर्तनाला समजून घेण्यास मदत करतात. स्किड मार्क आणि टायरच्या खुणा तपासकर्त्यांना चालकाने टक्करपूर्वी ब्रेक लावला होता आणि वाचविण्याचा प्रयत्न केला होता का, वेग कायम ठेवला होता का, वेग वाढविला होता हे जाणून घेण्यास मदत करू शकतात.
हिट-अँड-रन प्रकरणी कसा व्हावा तपास
हिट-अँड-रन प्रकरणांच्या वैज्ञानिक पद्धतीने योग्य तपासासह डिजिटल उपकरणांचा वापर गुन्हेगारांवर नजर ठेवणे आणि त्यांना दंडित करत उदाहरण सादर करण्यासाठी केला जाऊ शकतो. कॅमेऱ्यांचा वापर करत कव्हरेज एरिया आणि मॉनिटरिंग पॉइंट वाढविल्याने महामार्गावर दुर्घटनांच्या स्थितीत संशयितांना ताब्यात घेण्यास मदत होऊ शकते. कॅमेऱ्यांना ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन सिस्टीमसोबत इंटीग्रेटेड करण्यात यावे, जेणेकरून ऑटोमॅटिक पद्धतीने वाहनांचा शोध घेता येईल आणि हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्सच्या तपासणीतून एएनआरएसला वाहनांचा शोध घेण्यास मदत मिळेल. युरोपीय देश, जपान, संयुक्त अरब अमिरात समवेत अनेक देशांनी रस्ते दुर्घटना आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास यश मिळविले आहे. वेगाने विकसित होणाऱ्या भारतासाठी रस्ते दुर्घटनांमध्ये होणाऱ्या ईजा अणि मृत्यूंच्या मोठ्या संख्येचे आर्थिक नुकसान देखील आहे. रस्ते दुर्घटनांचा सामाजिक-आर्थिक खर्च देशाच्या जीडीपीच्या सुमारे 3.14 टक्के असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2023 च्या एका अध्ययनाचा दाखला देत म्हटले आहे. भ्रष्टव्यवस्था आणि मानवी मृत्यूबद्दलच्या बेफिकिरीमुळे भारत हिट-अँड-रनचा देश ठरला आहे.
- संकलन - उमाकांत कुलकर्णी