बोपण्णाचा इतिहास
43 व्या वर्षी पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. वयाच्या 43 वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद बोपण्णाने आपल्या नावावर केले आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंडो-ऑस्ट्रेलियन एक्स्प्रेसने इटालियन जोडी सिमोन बोलेली आणि आंद्रे वाव्हासर यांचा 7-6 (0), 7-5 असा पराभव केला. विशेष म्हणजे, या जेतेपदसह बोपण्णाने अनोखा विक्रम नोंदवला आहे. बोपण्णा हा सध्या 43 वर्षांचा आहे. एवढ्या वयात ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जगातील कोणत्याही खेळाडूला 43 व्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही.
यंदाच्या वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या बोपण्णा व एब्डेन जोडीने अंतिम लढतीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. अंतिम लढतीत या जोडीसमोर इटलीच्या बोलेली व वाव्हासार जोडीचे आव्हान होते. पहिल्या सेटमध्ये बोपण्ण आणि एब्डन यांनी चांगली सुरुवात केली. मात्र इटालियन जोडीने त्यांना कडवी टक्कर देत सेट टायब्रेकरवर नेला. अखेर टायब्रेकरवर गेलेला सेट बोपण्णा आणि एब्डन यांनी 7-6 (7-0) असा जिंकला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील इटालियन जोडीने दमदार खेळ करत पहिले दोन गेम जिंकले होते. त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली मात्र अनुभवी बोपण्णा आणि एब्डनने 3-3 अशी बरोबरी करत दुसरा सेट देखील चुरशीचा केला. मात्र चौथा गेम सिमोन आणि आंद्रे यांनी जिंकत पुन्हा आघाडी घेतली. मात्र पिछाडी भरून काढत बोपन्ना आणि एब्डनने दुसऱ्या सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी केली. त्यानंतर आपल्या कामगिरीत सातत्य राखताना हा सेट 7-5 असा जिंकत इतिहास रचला.
.कारकिर्दीतील दुसरे ग्रॅडस्लॅम जेतेपद
बोपण्णाने याआधी 2010 व 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली होती. मात्र त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या वर्षी मात्र मॅथ्यू एब्डनच्या साथीने पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावण्याची किमया केली आहे. बोपण्णाचे हे कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. यापूर्वी, 2017 मध्ये त्याने फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाच्या गॅब्रिएलासोबत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय, बोपण्णा व एब्डन यांचे पुरुष दुहेरीतील पहिलेवाहिले अजिंक्यपद आहे. विशेष म्हणजे, ग्रँडस्लॅम जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी, महेश भूपती व सानिया मिर्झा यांनी ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
दुहेरी क्रमवारीत नं 1 व पद्यश्री पुरस्कार
दोनच दिवसापूर्वी बोपण्णाने आपला साथीदार मॅथ्यू एब्डनसह ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत पोहोचत बोपण्णा कारकिर्दीत प्रथमच दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यासह, तो एटीपी क्रमवारीच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. यानंतर दोन दिवसातच बोपण्णाने जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे. याशिवाय, दोन दिवसापूर्वी बोपण्णाला देशातील चौथ्या क्रमांकाच्या पद्यश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये याआधी दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण जेतेपद मिळवण्यात अपयश आले होते. यंदा मात्र अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियन साथीदार एब्डनसह शानदार खेळ साकारला. एटीपी क्रमवारीत दुहेरीत अव्वलस्थान, मानाचा पद्यश्री पुरस्कार व ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
रोहन बोपण्णा, भारतीय टेनिसपटू.