महिला टेबल टेनिस संघाने रचला इतिहास
ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत :
वृत्तसंस्था/ पॅरिस
श्रीजा अकुला, अर्चना कामथ व मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या भारताने चौथ्या क्रमांकाचा संघ रोमानियाचा 3-2 असा पराभव केला. आता, उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना जर्मनी किंवा अमेरिकेशी होईल.
सोमवारी झालेल्या महिला सांघिक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीजा आणि अर्चना यांनी आघाडी मिळवून दिली. या भारतीय जोडीने सलामीच्या लढतीत रोमानियाच्या एडिना आणि समारा जोडीचा 3-0 असा पराभव करून आघाडी घेतली होती. भारतीय जोडीने एडिना आणि समारा यांचा 11-9, 12-10, 11-7 अशा फरकाने पराभव केला. यानंतर एकेरीच्या सामन्यात मनिका बात्राने बर्नाडेटचा सहज पराभव केला. मनिकाने ही लढत 11-5, 11-7, 11-7 अशा फरकाने जिंकली. मनिकाच्या या विजयासह भारताने 2-0 अशी आघाडी घेतली.
पहिले दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडीवर असलेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात पिछाडीवर पडला. श्रीजा अकुला एलिझाबेथ समारा विरुद्ध रोमहर्षक एकेरी सामन्यात हरली. या सामन्यात समाराने श्रीजाचा 3-2 असा पराभव केला. श्रीजा आणि समारा यांच्यातील सामना खूपच चुरशीचा होता. ज्यात समाराने शेवटी 8-11, 11-4, 7-11, 11-6, 11-8 असा विजय मिळवला. श्रीजाने सामना गमावला असला तरी भारताची रोमानियावर 2-1 अशी आघाडी होती. यानंतर अर्चना कामथला चौथ्या सामन्यात बर्नाडेटविरुद्ध 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. अर्चना या सामन्यात बर्नाडेटला आव्हान देऊ शकली नाही आणि तिला 5-11, 11-8, 7-11, 9-11 ने पराभवाचा सामना करावा लागला.
भारत आणि रोमानिया यांच्यातील स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता आणि सामन्याचा निकाल पाचव्या आणि अंतिम सामन्यात लागला. या सामन्यात मनिकाने एडिना डियाकानूचा 3-0 (11-5, 11-9, 11-9) असा पराभव केला. दरम्यान, आज उपांत्यपूर्व फेरीत शानदार कामगिरी करत महिला टेबल टेनिस संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न असेल.