ऐतिहासिक
अमेरिका स्थित भारतीय वंशाची महिला सुनीता विल्यम्स हिने सोबती विल्मोर सोबत बुधवारी पहाटे एक नवा इतिहास रचला. दोघांनी अंतराळ प्रयोगशाळेत नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ राहून आपली मोहीम फत्ते केली. सुनीता आणि विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व अडचणी सर्व प्रकारचे अडथळे दूर करत पृथ्वीवर परतले आणि अंतराळ संशोधन आणि अंतराळ मोहीम या संदर्भात एक नवे शिखर पादाक्रांत झाले. हे दोघेही तब्बल 9 महिनेहून अधिक काळ अंतराळात होते. कुणी त्यांना अडकून पडले असे संबोधले पण त्यांना तसे वाटले नाही. संकट ही संधी मानावी आणि त्यावर स्वार होत यश कसे खेचून आणावे याचे मूर्तीमंत उदाहरण या मंडळींनी घालून दिले. इच्छा तेथे मार्ग असतोच हे या उदाहरणावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. स्पेस टेक्नॉलॉजीत माणूस किती वाकबगार झाला आहे. अचूकता आणि कौशल्यता यात कशी पारंगतता मिळवता आली आहे याचे दर्शन या निमित्ताने झाले आहे. अंतराळ संशोधनात या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण पाउल पडले आहे. ओघानेच ते कौतुकास पात्र आहे. अवघे विश्व आनंदले आहे. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल टाकले तेव्हा जसा आनंद होतो तसाच नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळात राहून संशोधन करुन पुन्हा पृथ्वीवर परत येण्याचा आनंद आहे. आता या संशोधनाचे तपशील आणि पुढील टप्पे हळूहळू ज्ञात होतील. या चौघांचा परतीचा प्रवास सुरु असताना मधला काही काळ कॅप्सूल सोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. पण अनेकांचा त्याक्षणी काळजाचा ठोका चुकला. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.
ड्रॅगन हे ऑटोमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वत:चा मार्ग स्वत: ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता. 57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्य सर्वांना दिसत होती. जगाचे डोळे या घटनेकडे होते. अखेर बुधवारी पहाटे चार अंतराळवीरांचे पृथ्वीवर परतणे ही मोठी, महत्त्वपूर्ण आणि सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशी कामगिरी नोंदवली गेली. नासा, त्यांची सगळी टीम आणि जगभरातील अंतराळ संशोधक आणि स्वत: सुनीता विल्यम्स व या इतिहासातील त्याचे भागीदार अभिनंदनास पात्र आहेत. ‘ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी चार अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.
उद्योगपती एलॉन मस्क यांचा या मोहिमेत सहभाग होता. प्रवासी वाहन कोणतेही तेथे मस्क हवेत हा संदेश देण्याचा त्यामागे हेतू होता. ट्रंपतात्याही आनंदले आहेत. जगभरातून या घटनेचे स्वागत होते आहे. ते कसे सुखरूप परतते याकडे विश्वाचे लक्ष लागले होते पण
ड्रॅगन नियोजनानुसार निर्धारित वेळेत आणि निर्धारित ठिकाणी पाठवण्यात आणि परत आणण्यात अंतराळ संशोधक यशस्वी झाले आणि एक इतिहास रचला गेला. अंतराळ संशोधनात भारतही अवघड पण अचूक कामगिरी करण्यात अव्वल आहे. इस्त्राsने नुकतीच चांद्रमोहीम 5 मोहीम हातात घेतली आहे. उपग्रह अचूक पाठवण्यात इस्त्राs माहिर आहे. कल्पना चावला ते सुनीता विल्यम्स हा प्रवास दीर्घ व रोमांचकारी व कडवा व संघर्षमय आहे पण या प्रवासात विश्वाचे रुप पालटण्याचे सामर्थ आहे. ब्रह्मांडात आणि कुठे मानवी वस्ती आहे का? मानवाला वस्ती करण्यास आणखी कोणता ग्रह उपग्रह योग्य आहे हे ज्या क्षणी गवसेल तो क्षण जगाला नवी दिशा देईल. रिक्षाचे भाडे प्रत्येक किलो मीटरला होते त्यापेक्षा कमी भाडे खर्चात आपण मंगळयान मंगळावर उतरवले होते. अंतराळ संशोधनात पुढे काय वाढून ठेवले आहे याचा आज कुणालाच अंदाज नाही पण या संशोधनात मानवाने गती घेतली आहे. यशाचे विक्रमांचे नवनवे गड सर होत आहेत, हे कबूल करावेच लागेल. खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते. पण आपण अडकलो असा भाव न बाळगता या दोघांनी सकारात्मक राहून संशोधन केले, निरनिराळी निरीक्षणे नोंदवली. अनेक गोष्टींचा वेध घेतला. इतिहास रचला आणि ते परतले तेव्हा अवघ्या जगाने त्यांचे स्वागत केले. फटाके फोडले, मिठाई वाटली आणि सुनीता यांच्या गुजरातमधील मूळ गावी दिवाळीच साजरी झाली. या नऊ महिन्यांच्या काळात अंतराळवीर खंबीर राहीले पण त्यांच्या कुटुंबियांची, आप्तेष्टांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी. सुखरुप पृथ्वीवर आल्यावर अमेरिकन सरकारने त्यांना सुरक्षित विश्रांतीसाठी बाजूला ठेवले आहे. नऊ महिन्यांहून आधिक काळ अंतराळात राहिल्याने या दोघा अंतराळवीरांच्या शरीरावर, वजनावर, रक्तदाबासह अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे पण त्यानंतर जे निष्कर्ष बाहेर येतील ते खचितच नवे, दिशादर्शक व प्रागतीक असतील. सुनीता यांनी पृथ्वीवर सुखरुप परतताच हात हलवून जो आनंद व्यक्त केला आहे तो अर्थपूर्ण आहे. सुनीतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ती मानवाच्या विजयाची आहे आणि इच्छा तेथे मार्ग या वचनाला धरुन आहे.