भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी
कसोटीत ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभूत करण्याची किमया
वृत्तसंस्था/ मुंबई
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे, 2014 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन महिला संघाला कसोटीमध्ये हार पत्करावी लागली आहे. दरम्यान, सामन्यात सात बळी घेणाऱ्या स्नेह राणाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय महिलांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला. यानंतर प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 261 धावा करता आल्या व टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी 75 धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य टीम इंडियाने 18.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
स्नेह राणाचे चार बळी, कांगारु 261 धावांवर ऑलआऊट
ऑस्ट्रेलियन महिला संघाने 5 बाद 233 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या 28 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 105.4 षटकांत 261 धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात अॅश्ले गार्डनरच्या रूपाने कांगारुंना पहिला धक्का बसला. 27 चेंडूत 7 धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्रकारच्या चेंडूवर ती पायचीत झाली. तिच्यानंतर अनुभवी अनाबेल सदरलँड 27 धावा करुन स्नेह राणाची शिकार झाली. त्यानंतर स्नेहने अॅलाना किंगला (0) क्लीन बोल्ड केले. राजेश्वरी गायकवाडने लॉरेन चीटलला (4 धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिल्यानंतर गायकवाडने अॅश्ले गार्डनरला (9 धावा) बाद करुन ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. भारतीय संघाला विजयासाठी अवघे 75 धावांचे टार्गेट मिळाले. भारताकडून स्नेह राणाने अप्रतिम गोलंदाजी करताना 63 धावांत 4 गडी बाद केले तर राजेश्वरी गायकवाड व हरमनप्रीतने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारतीय महिलांचा सहज विजय
टीम इंडियाने विजयासाठीचे 75 धावांचे टार्गेट 18.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. स्मृती मानधनाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा घोषने 13 धावांचे योगदान दिले. जेमिमा रॉड्रिग्ज 12 धावांवर नाबाद राहिली. शेफाली वर्माला केवळ 4 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 219 व दुसरा डाव 105.4 षटकांत सर्वबाद 261 (बेथ मुनी 33, एलिस पेरी 45, ताहलिया मॅकग्रा 73, अॅलिसा हिली 32, सदरलँड 27, स्नेह राणा 4 बळी, राजेश्वरी गायकवाड व हरमनप्रीत प्रत्येकी दोन बळी).
भारत पहिला डाव 406 व दुसरा डाव 18.4 षटकांत 2 बाद 75 (शेफाली वर्मा 4, स्मृती मानधना नाबाद 38, रिचा घोष 4, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद 12, किम गर्थ व गार्डनर प्रत्येकी एक बळी).
महिला क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर प्रथमच विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये 1977 पासून आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने 4 विजय मिळवले तर 6 कसोटी अनिर्णित राहिल्या. यानंतर तब्बल 46 वर्षानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 8 गड्यांनी पराभूत करत पहिल्यावाहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी, मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 14 ते 17 डिसेंबर दरम्यान झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव केला होता. महिलांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला.
कठोर मेहनतीचे फळ : हरमनप्रीत कौर
हा विजय अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आहे. विजयाचे श्रेय सपोर्ट स्टाफ, गोलंदाजी प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षकांनाही आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा ऐतिहासिक विजय कठोर मेहनत आणि संयमाचे फळ आहे. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा विचार केला, तो आम्हाला फायदेशीर ठरला असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीतने दिली. संघातील प्रत्येक खेळाडूने मोलाचे योगदान दिले असल्याचेही ती म्हणाली.
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा कॅमेरा घेऊन मैदानात...
भारतीय महिला संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, हा सामना संपल्यानंतर मैदानावर एक मन जिंकणारा नजारा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हिली भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय स्वत: कॅमेरा हातात घेऊन कैद करताना दिसली. यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करत होते, याचवेळी अॅलिसा हिलीने हे ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात टिपले. तिने भारतीय खेळाडूंच्या जल्लोषाचे फोटो काढले. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हिलीचा फोटो काढतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.