भारतीय महिलांचा ऐतिहासिक विजय
इंग्लिश महिलांचा घरच्या मैदानावर केला दारुण पराभव : टी 20 मालिकेत 3-1 ने आघाडीवर : राधा यादव सामनावीर
वृत्तसंस्था/मँचेस्टर
भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव करत टी 20 मालिका आपल्या नावे केली आहे. भारताच्या पुरुष क्रिकेट संघानंतर आता टीम इंडियाच्या महिला संघाने या विजयासह इतिहास घडवला आहे. पुरुष संघाने 58 वर्षांनंतर बर्मिंगहममध्ये कसोटी जिंकत पराभवांचा दुष्काळ संपवला. तर आता महिला संघाने इंग्लंडविरुद्ध 19 वर्षांनी त्यांच्या घरच्या मैदानावर टी-20 मालिका जिंकली आहे. बुधवारी झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यामध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
दरम्यान, या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भारताचा या मालिकेतील विजयही निश्चित झाला आहे. सामन्यात 15 धावांत 2 बळी घेणाऱ्या राधा यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील शेवटचा व पाचवा सामना दि. 12 रोजी होईल. भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये टी20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी झालेल्या 6 द्विपक्षीय टी 20 मालिकेत भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
स्मृती, शेफाली, हरमनप्रीतची चमक
बुधवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी माफक 127 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारतीय महिला संघाने 17 षटकातच 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सलामीला फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारीही केली. पण 7 व्या षटकात शेफालीला चार्लोट डीनने 31 धावांवर ऍलिस कॅप्सीच्या हातून झेलबाद केले. पाठोपाठ 9 व्या षटकात स्मृती मानधनालाही 32 धावांवर सोफी इक्लेस्टोनने लॉरेन फिलरच्या हातून झेलबाद केले. पण नंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव पुढे नेला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. पण हरमनप्रीत विजयासाठी केवळ 10 धावांची गरज असताना 16 व्या षटकात बाद झाली. पाठोपाठ 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अमनज्योत कौर 2 धावांवर धावबाद झाली. पण उर्वरित 8 धावा ऋचा घोष आणि जेमिमाने पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. जेमिमाह 24 धावांवर नाबाद राहिली, तर ऋचा 7 धावांवर नाबाद राहिली.
राधा यादवसमोर इंग्लिश महिलांची शरणागती
तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 126 धावा केल्या. इंग्लंडकडून सोफीया डंकलीने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार टॅमी ब्युमांटने 20 धावा केल्या. याशिवाय भारतीय गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना मोठे शॉट्सही खेळता आले नाही. डंकली आणि ब्युमाँटशिवाय ऍलिस कॅप्सी (18), पेज स्कॉलफिल्ड (16), सोफी इक्लेस्टोन (नाबाद 16) आणि इजी वाँग (नाबाद 11) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली, पण कोणीही मोठी खेळी करु शकले नाहीत. भारताकडून गोलंदाजी करताना राधा यादवने 4 षटकात 15 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. श्री चरणीने 2 विकेट्स घेतल्या, तर दीप्ती शर्माने 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लिश महिला संघ 20 षटकांत 7 बाद 126 (डंकली 22, कॅप्सी 20, इक्लेस्टोन नाबाद 16, राधा यादव आणि श्री चरणी प्रत्येकी दोन बळी) भारतीय महिला संघ 17 षटकांत 4 बाद 127 (स्मृती मानधना 32, शेफाली वर्मा 31, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद 24, हरमनप्रीत कौर 26, चार्लोट डिन, सोफी इक्लेस्टोन आणि इजी वाँग यांनी प्रत्येकी 1 बळी).