सनई-चौघड्यांच्या सुरात चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ
पोलीस आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती : यावर्षी वेळेत सुरुवात, मंडळांकडूनही प्रतिसाद
बेळगाव : ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ झाला. सनई-चौघडे, तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. बेळगावचे लोकप्रतिनिधी व शिवप्रेमींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ झाला. पालखी पुढे सरकताच मंडळांनी देखावे सादर करण्यास प्रारंभ केला. प्रारंभी मारुती गल्ली येथून पालखी वाजतगाजत नरगुंदकर भावे चौकात नेण्यात आली. तेथे पालखीचे पूजन करण्यात आले. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या हस्ते पालखी पूजन झाले.
पालखीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज व बैलगाडीतील त्यांचे मावळे असा सुंदर देखावा माळी गल्ली मंडळाने साकारला. एक चिमुकला घोड्यावर स्वार होऊन शिवभक्तांचे मनोबल वाढवत होता. गुरुवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून मारुती गल्ली येथे चित्ररथ उभे करण्यात आले होते. समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळाने पहाटेच आपला चित्ररथ मारुती गल्लीत आणून ठेवला. त्यांच्या पाठोपाठ मारुती गल्ली, बाल शिवाजी युवक मंडळ रामा मेस्त्री अड्डा, संभाजी गल्ली, महाद्वार रोड, ताशिलदार गल्ली, अनंतशयन गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, ज्युनियर शिवाजी पार्क या मंडळांनी चित्ररथ उभे केले होते.
मुधोळ येथील शिवभक्ताने जिंकली मने
पालखी मिरवणुकीला सुरुवात होताच एका आठ वर्षीय चिमुकल्याने शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक दाखविले. मुधोळच्या महालिंगपूर येथील विनायक संतोष हजेरी या लहानग्या शिवभक्ताने तलवारबाजीसह दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखविले. आमच्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत नाही. त्यामुळे आम्ही बेळगावला येऊन युद्धकलांचे प्रात्यक्षिक दाखवितो, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्या चिमुकल्याने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मदन बामणे, माजी आमदार अनिल बेनके, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, रणजित चव्हाण-पाटील, प्रकाश शिरोळकर, माया कडोलकर, गणेश दड्डीकर, अंकुश केसरकर, रमेश पावले यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
शिरीष गोगटे मित्र मंडळाकडून पाण्याचे वाटप
बेळगावचे उद्योजक व एक शिवप्रेमी म्हणून ओळख असलेल्या शिरीष गोगटे व त्यांच्या मित्र मंडळाकडून शिवप्रेमींची मदत करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी शिवप्रेमींची तहान भागविण्याचे काम त्यांनी केले. शिवप्रेमींना मोफत पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर काही युवकांकडून देखावे पाहण्यासाठी आलेल्यांना मोफत अल्पोपहार वितरण करण्यात आले.
महापौर-उपमहापौर भजनात दंग
वडगाव येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे वारकरी मिरवणुकीच्या अग्रभागी होते. त्यांच्यासोबत सनई चौघड्यांचे सूर वाजवत अनगोळ येथील वादक मिरवणुकीची शान वाढवत होते. भजनाचा स्वर कानावर पडताच महापौर मंगेश पवार यांनी टाळ वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर वाणी जोशी यादेखील टाळ घेऊन सहभागी झाल्या. त्यामुळे चित्ररथ मिरवणुकीत महापौर-उपमहापौर भजनात दंग झाल्याचे दिसून आले.