भारतीय महिलांचे ऐतिहासिक यश
महिला विश्वचषक स्पर्धेतील कांगारू विरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना हा अंतिम सामन्यापूर्वीचा अंतिम सामना होता. याच ऑस्ट्रेलियन संघाने 1982 पासून ते काल-परवापर्यंत महिला क्रिकेटमध्ये प्रचंड हुकूमत गाजवली होती. ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ असं म्हणत ते नेहमीच महिला विश्वचषक स्पर्धेचे नामकरण करायचे. या हुकूमतीला धोबीपछाड देत भारतीय संघाने या स्पर्धेचं नवीन नामकरण केलं. मागील काही वर्षे भारतीय महिला संघ विश्वचषक स्पर्धेच्या इव्हेंटमध्ये कधी सेमी फायनलमध्ये तर कधी फायनलमध्ये पोहोचत होती. पण ‘ती’ अंतिम शिकार त्यांच्या हातून होत नव्हती. संगीत खुर्चीतील संगीत संपल्यानंतर शेवटच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान त्यांना मिळत नव्हता. परंतु काल ते अजिंक्यपदाचं सिंहासन, तो बहुमान असं सर्व काही मिळालं. म्हणतात ना ‘अंत भला तो सब भला’ या उक्तीप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघाने काल शेवट खऱ्या अर्थाने गोड केला. अर्थात असं घडलं नसतं तर बरेच क्रिकेट विश्लेषक ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो विजय एक ‘फ्लुक’ होता, असं म्हणण्यास मागेपुढे धजावले नसते.
काल परवा ऑस्ट्रेलियाला हरवत आपण ड्रेसिंग रूममध्ये जे आनंदी आनंद गडे च वातावरण ठेवलं होतं त्या वातावरणात कुठलाही मिठाचा खडा पडला नाही. युद्धात आणि खेळामध्ये नुसते दारूगोळा आणि शस्त्र असून चालत नाही. त्यांचा योग्य वापर योग्य वेळी करावा लागतो. नेमकं हे चित्र शेवटच्या दोन महत्त्वपूर्ण सामन्यात आपल्याला भारतीय संघाकडून बघायला मिळालं. (फलंदाजी आणि गोलंदाजीतील अचूक बदल). स्पर्धेच्या सुरुवातीला पहिला आणि दुसरा गिअर व्यवस्थित टाकल्यानंतर मध्येच गिअरबॉक्समध्ये अडचण आली. परंतु गिअरबॉक्समध्ये सुधार झाल्यानंतर भारतीय संघाने स्पेशल गिअर टाकत या स्पर्धेत ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान प्राप्त केलं. या पूर्ण स्पर्धेत क्षेत्ररक्षण ही बाब ऑप्शनला टाकत गोलंदाजी आणि विशेषत: फलंदाजी या दोन बाबींवर लक्ष केंद्रित करत बाद फेरीत प्रथम ऑस्ट्रेलियाला आणि निर्णायक क्षणी दक्षिण आफ्रिकेला घालीन लोटांगण करण्यास भाग पाडलं.
कधी कधी जुने हिंदी चित्रपट बघताना अभिनयात मधुबाला श्रेष्ठ की नर्गिस हा प्रश्न माझ्यासमोर पडतो. नेमका तसाच प्रश्न शेफाली आणि दीप्ती यांच्या अंतिम सामन्यातील कामगिरीच्या निमित्ताने पडला होता. मोक्याच्या क्षणी 100 टक्के यश कसे मिळवायचं ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि एका प्रादेशिक पक्षाचे प्रमुख असणाऱ्या पवन कल्याण यांना विचारा. नेमकं असंच यश भारतीय संघाने शेवटच्या दोन सामन्यात मिळवलं. तेही विरोधी पक्ष प्रचंड प्रबळ असताना.
भारतीय संघ यावेळी मात्र सुरुवातीपासूनच या विश्वचषकाच्या प्रेमात पडला होता. नुसते प्रेमातच नाही तर त्याचे रूपांतर कांगारूच्या विजयाने साखरपुड्यात तर अंतिम सामन्यात आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने लग्नात केलं. आता आपण काही वर्षे त्यांचा सुखी संसारही बघू.
बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमध्ये आपण बरीच वाईल्डकार्ड एन्ट्री बघतो. हे प्रवेश फक्त मनोरंजनासाठी असतात. प्रतीका रावलच्या दुखापतीनंतर शेफाली वर्माची एन्ट्री ही माझ्या मते वाईल्ड कार्डसारखीच होती. तिने काल खऱ्या अर्थाने धमाका केला. दोन सामन्यासाठी आली खरी परंतु ‘बिग बॉस’ बनून गेली. मी या निमित्ताने मात्र निवड समितीचे आभार मानतो. कारण 14 च्या चमूत शेफालीला टक्कर देणारे खेळाडू असताना सुद्धा शेफाली वर्मावर विश्वास दाखवला. आणि तिने तो विश्वास सार्थही केला. तोही शेवटच्या क्षणी. कधी कधी युद्धात आणि खेळामध्ये धोका न पत्करणे हाच मोठा धोका असतो. परंतु हा धोका निवड समितीने शेवटच्या क्षणी तडीस नेला.
फार वर्षांपूर्वी ‘लोभ नसावा ही विनंती’ या मालिकेतून चिमणराव आणि गुंड्याभाऊ या जोडीने (दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे) रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. सध्या क्रिकेट म्हटलं आणि आयसीसी इव्हेंटच्या अंतिम सामन्यात शर्माजी आणि वर्माजी ही जोडी आलीच. किंबहुना त्यांच्याशिवाय (पुरुष भारतीय क्रिकेटमध्ये शर्माजी आणि वर्माजी कोण हे आता वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही). अंतिम सामन्यात आपलं पानही हलत नाही. या गोष्टीला महिला क्रिकेटही अपवाद नाही. याला योगायोग म्हणावा की नियतीचा खेळ, हा एक भारतीय क्रिकेटसाठी संशोधनाचा विषय असू शकेल. असो. भारतीय महिलांच्या या अभूतपूर्व यशाला निश्चित शॉर्टकट नव्हता. काल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्ताने डायना एडलजी विशेष अतिथी कक्षामध्ये होत्या. दुसरीकडे अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी समालोचक म्हणून वावरत होत्या. शरीर त्यांचं मैदानाबाहेर होतं परंतु मन 22 यार्डच्या आतमध्ये घुटमळत होतं. दुसरीकडे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी प्रथम श्रेणीत खोऱ्यांनी धावा जमवून सुद्धा कसोटी क्रिकेटचा टिळा त्यांच्या माथी लागला नव्हता. अमोल मुजुमदार यांना मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी करंडक सामन्याचे आकाशवाणीवरून धावते समालोचन करताना त्यांची फलंदाजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून पहाता आली होती. हा पठ्ठ्या एक-दोन नव्हे तब्बल तीस वर्षे थांबला. काल ते थांबणं कायमचे संपलं. अंगावरती ब्लू जर्सी आणि हातात विश्वकप उंचावताना आपण बघितलं. परंतु या सर्व मंडळींना थोडा उशिरा का होईना नियतीने न्याय दिला. नव्हे तो देण्याशिवाय गत्यंतरही नव्हते. ज्या महिला क्रिकेटकडे लोक सुरुवातीला नाके मुरडायचा। त्याच महिला क्रिकेटला अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी आणि सरते शेवटी हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाने तमाम क्रिकेट रसिकांना कुर्निसात करण्यास भाग पाडलं, एवढं मात्र खरं! पुन्हा एकदा भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन!!!
-विजय बागायतकर