‘गायब’ केले स्वत:चेच शीर
कोणीतही कोणाचा तरी शिरच्छेद केल्याच्या घटना वृत्तपत्रांमध्ये कधीकधी प्रसिद्ध होत असल्याने आपल्याला त्यांची माहिती असते. तसेच आपण जेव्हा जादूचे प्रयोग पाहण्यास जातो, तेव्हा जादूगार हातचलाखी करुन अशा करामती करुन दाखवितात. पण 3 वर्षांच्या एका बालिकेने एका वेगळ्या प्रकारे आपले शीर स्वत:च्या हाताने स्वत:चेच शीर गायब केल्याची घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच प्रसिद्ध होत आहे. सोशल मिडियावर जे दृष्य दिसते, त्यात या मुलीचे शीर एका लाकडी खोक्यात असल्याचे प्रथम दिसते. त्यानंतर ती हे खोके सर्व बाजूंनी बंद करते. त्यानंतर या खोक्याच्या बाजूंनी असणाऱ्या भेगांमध्ये ती सहा धारदार सुरे बसवते. नंतर खोक्याच्या पुढच्या भागात एक दांडाही ती बसवते. नंतर जेव्हा ती खोके उघडते तेव्हा तिचे शीर नाहीसे झाल्याचे दिसून येते.
हा काय प्रकार आहे याची चर्चा आता सुरु झाली आहे. या प्रकाराचा जो रहस्यभेद नंतर करण्यात आला आहे, त्यातून या साऱ्या प्रकाराचे मेख त्या खोक्यात आहे, असे समजून येते. या खोक्याच्या आंतर्भागाची रचना विशेष प्रकारे केल्याचे दिसून येते. खोक्याच्या दोन समोरासमोरील बाजूंवर आरसे बसविलेले आहेत. जेव्हा सुरे या खोक्यात घातले जातात, तेव्हा ते या आरशांना घासून बाजूने वळतात आणि मधल्या भागात या मुलीचे शीर सुरक्षित राहते. त्यानंतर दांडा या खोक्यात घातला जातो त्यामुळे आरसे दिसेनासे होतात आणि त्या आरशांमध्ये दिसणारे मुलीचे शीरही दिसेनासे होते. परिणामी, जेव्हा खोके उघडले जाते, तेव्हा तिचे शीर गायब झाल्याचे दिसून येते आणि लोक आश्चर्यचकित होतात. अर्थातच हा चमत्कार नसून ही एक प्रकारची हातचलाखीच आहे. पण मोठ्या जादूगारांना जे महत्प्रयासाने जमेल, ते या 3 वर्षांच्या बालिकेने करुन दाखवावे, याचे आश्चर्य लोकांना अधिक वाटते. हाच चमत्कार मानला जात आहे.