हिरेबागेवाडी पोलिसांकडून गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक
650 ग्रॅम गांजा जप्त
बेळगाव : पोलिसांनी रविवारीही अमलीपदार्थांविरुद्ध कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी पोलिसांनी खमकारहट्टी पुलाजवळ गांजा विकणाऱ्या हलगा येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 650 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खमकारहट्टी पुलाजवळ पिराजी यल्लाप्पा येसोचे (वय 32) राहणार गणपत गल्ली, हलगा याला अटक करून त्याच्याजवळून 650 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे 30 हजार रुपये इतकी होते. बेळगाव शहर, उपनगर व तालुक्यातील विविध गावात अमलीपदार्थांची विक्री वाढली आहे. विक्रेते विद्यार्थी व तरुणाईला आपले लक्ष्य बनवत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरही गांजा विक्री केली जात होती. हलगा येथील युवकाला अटक करून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. त्याच्यावर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.