For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदूंच्या अधिकार संरक्षणासाठी ‘हिंदुत्व संकल्पना’

11:38 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदूंच्या अधिकार संरक्षणासाठी ‘हिंदुत्व संकल्पना’
Advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक अक्षय जोग यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान

Advertisement

बेळगाव : हिंदूंच्या राजकीय, सामाजिक न्याय मानवाधिकार अतिक्रमणाविरोधात हिंदूंचे रक्षण करणे म्हणजे हिंदुत्व ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्ववादाची हिंदुत्वची कल्पना होती. हिंदूंच्या न्याय व नागरी अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व ही संकल्पना पुढे आणली, असे विचार पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक अक्षय जोग यांनी व्यक्त केले. सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेत जोग यांनी ‘सावरकरांचा हिंदुत्ववाद’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाअंतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सत्रात पुणे येथील अक्षय जोग यांनी ‘सावरकरांचा हिंदुत्ववाद’ या विषयावर प्रकाश टाकला. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात आयोजित व्याख्यानमालेला जीआयटी कॉलेजचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. व्यासपीठावर अध्यक्षा स्वरुपा इनामदार, चेअरमन सुहास सांगलीकर, सचिव आर. एम. करडीगुद्दी, उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिझरे, लेखिका माधुरी शानभाग उपस्थित होत्या.

ते म्हणाले, सावरकरांचे हिंदुत्व संकल्पनेबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. कारण खुद्द सावरकरांच्या समर्थकांना सुद्धा हिंदुत्व या संकल्पनेची पूर्ण स्पष्टता आजही नाही. सावरकरांच्या मते सिंधू सागर ते सिंधू नदीपर्यंत ज्या व्यक्तीची भारतभूमी ही पितृभूमी व पुण्यभूमी आहे, तो हिंदू होय. पितृभूमी याचा अर्थ वडिलांची भूमी नव्हे तर पितरांची भूमी होय. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे, असे नाही किंवा तसे लादूनही चालणार नाही याची सावरकरांना पूर्ण कल्पना होती, असे जोग म्हणाले. सप्त बेड्यांनी जखडलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व संकल्पनेचा पाठपुरावा केला. जोवर हिंदू म्हणून आमच्यावर अन्याय होत आहे तोपर्यंत आम्ही त्याला उत्तर देऊ. हिंदुत्व हे आमचे धोरण आहे, परंतु आमचे अंतिम ध्येय मानवताच आहे. त्यासाठीचा एक टप्पा म्हणजे हिंदूत्व होय, असे सावरकर यांनी स्पष्ट केले असल्याचे जोग यांनी नमूद केले

Advertisement

जोग पुढे म्हणाले, सावरकरांचे विचार हे जहाल होते, परंतु त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक मुस्लीम व ख्रिश्चनही त्यांच्यासोबत होते. सिंध सागरापासून सिंधू नगरीपर्यंत ज्यांची पितृभूमी (आई-वडिलांची भूमी) भारतीय आहे, त्यांना हिंदू म्हणून संबोधले जात होते. लखनौ करारामध्ये मुस्लीम लिगने 50 टक्के जागांची मागणी केली. याला गांधींचे समर्थक गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकरांनी विरोध दर्शविला होता. लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधीत्व द्यावे, ही भूमिका त्याकाळी सावरकरांनी मांडल्याचे त्यांनी सांगितले. लेखिका माधुरी शानभाग यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रारंभी अक्षता व विनायक मोरे यांनी सावरकर गीत सादर केले. स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक करून वाचनालयाचा आढावा घेतला. यावेळी राजेंद्र बेळगावकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. आश्विनी ओगले यांनी माधुरी शानभाग यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय सुनीता पाटणकर यांनी करून दिला.

स्वातंत्र्यवीर सावरकर लोकशाहीचे पुरस्कर्ते

स्वातंत्र्यवीर सावरकर 1937 पासून हिंदू महासभेवर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मुस्लीम अल्पसंख्याक असले तरी त्यांना विशेष अधिकार दिले जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली. ते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी गुलामगिरी सोबत अन्यायाविरोधातही लढा दिला. रोटी-बेटी बंदी, सहभोजन, स्पर्श बंदी यासह स्वदेशी सप्तबेडी झुगारण्याची ताकद सावरकरांनी दाखवून दिल्याचे जोग यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.