हिंदुस्थान युनिलिव्हर आईस्क्रीम व्यवसाय विकणार?
कंपनीच्या आईक्रीम व्यवसायात क्वालिटी वॉल्स, कॉर्नेटो आणि मॅग्नम सारख्या ब्रँडचा समावेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयुएल) ने बुधवारी आपल्या आईक्रीम व्यवसायाचे विलगीकरण करण्याचे जाहीर केले आहे. एचयूएलच्या आइक्रीम व्यवसायात क्वालिटी वॉल्स, कॉर्नेटो आणि मॅग्नम सारख्या ब्रँडचा समावेश आहे.
समितीच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब
एचयूएलच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आईक्रीम व्यवसायाला स्वतंत्र करुन त्यात अधिक प्रगती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र समितीच्या शिफारशीवर आधारित हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येते. समितीने सांगितले की, कंपनीच्या उलाढालीत 3 टक्के वाटा असलेल्या आइक्रीम व्यवसायाचे वेगळे ऑपरेटिंग मॉडेल आहे जे कंपनीच्या इतर व्यवसायांशी समन्वय मर्यादित करते. या मॉडेलमध्ये कोल्ड स्टोरेज स्ट्रक्चर आणि स्वतंत्र चॅनल परिस्थिती समाविष्ट आहे.
इतर व्यवसायावर देणार लक्ष
कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी रितेश तिवारी यांनी तिमाही निकाल जाहीर करताना सांगितले की एचयूएलने आईक्रीम व्यवसायाचे स्वतंत्रपणे मूल्यांकन केले आहे. मात्र, त्यांनी यासंबंधीचा तपशील शेअर केला नाही. ते म्हणाले की, ‘स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे’ आईक्रीमचा व्यवसाय विकला जाईल. हे कंपनीला तिच्या मूळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास आणि सौंदर्य, अन्न, आरोग्य आणि निरोगीपणा यासारख्या जोडव्यवसायांमध्ये स्वत:ला मजबूत करण्यास मदत करणार असल्याचा दावाही यावेळी केला आहे.