For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे!

06:22 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालमध्ये  हिंदू दुय्यम दर्जाचे
Advertisement

तृणमूल काँग्रेसच्या अल्पसंख्याक लांगूलचालनाच्या धोरणामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदू हे दुय्यम दर्जाचे नागरीक बनले आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते या राज्यातील बराकपूर येथील एका प्रचारसभेत भाषण करीत होते. या राज्यात हिंदूंना आपले सणही मोकळेपणाने साजरे करता येत नाहीत. येथील राज्यसरकार त्यांना रामनवमीचा उत्सव करु देत नाही. तसेच ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देण्यावरही या राज्यात प्रतिबंध आहे., असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

राज्याच्या मुख्यमंत्री सीएए कायदा रद्द करण्याची भाषा करतात. तथापि, हा कायदा साऱ्या देशासाठी आहे. त्यामुळे तो सर्व राज्यांना मानावाच लागणार आहे. पश्चिम बंगालसाठी तो विशेषरित्या आवश्यक असून याच संदर्भात मी केंद्र सरकारच्या वतीने या राज्यासाठी ‘पंचहमी’ देत आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या पाच हमी

Advertisement

  1. धर्माच्या आधारावर आरक्षण नाही, 2. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय यांचे आरक्षण कोणाला काढू दिले जाणार नाही, 3. श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यापासून आणि भगवान रामाची पूजा करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाहीत, 4. श्रीराम मंदिरासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, तो कोणीही पालटू शकणार नाहीत, तसेच 5. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कोणीही रद्द करु शकणार नाहीत, अशा पाच हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचार सभेत दिल्या आहेत.

तुष्टीकरणासामोर गुडघे टेकले

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांनी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासमोर गुडघे टेकले आहेत. हिंदूंना गंगा नदीत बुडवून टाका अशा घोषणा तृणमूलचे नेते देत आहेत. अन्य मागासवर्गीय, अनुसूजित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आरक्षण हिसाकावून ते मुस्लीमांना देण्याची या लांगूलचालनवादी नेत्यांची योजना आहे. कर्नाटकात अशा प्रकारे अन्य मागासवर्गीयांना मिळणारे आरक्षण मुस्लीमांना देण्यात आले आहे. हे भारतातील मतदारांना कधीही मान्य होणार नाही. विरोधी पक्ष देशविघातक राजकारण करीत आहेत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

हुमायून कबीरचे वादग्रस्त विधान

तृणमूल काँग्रेसचा आमदार हुमायुन कबीर याने ‘हिंदूंना भागीरथी नदीत बुडवून टाकू’ असे वादग्रस्त विधान जाहीररित्या एका प्रचारसभेत काही दिवसांपूर्वी केले होते. हिंदूंनी आता त्यांचे जीवन आणि अधिकार यांच्या सुरक्षेसाठी सावध राहण्याची आवश्यकता आहे, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Advertisement
Tags :

.