संतिबस्तवाड ग्रामस्थ, हिंदू संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : कारवाईबाबत तीव्र निषेध
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. याप्रकरणी संतिबस्तवाड गावातील निरपराध हिंदू तरुणांना पोलिसांकडून चौकशीला बोलावून मारहाण करण्यात येत आहे. पोलिसांवर दबाव असून हिंदू मुलांची चौकशी करण्यात येत आहे. पाच ते सहा दिवस पोलीस स्थानकात ठेवून निष्पाप तरुणांची चौकशी करण्यात येत आहे. या विरोधात बुधवारी संतिबस्तवाड ग्रामस्थ व हिंदू बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
संतिबस्तवाडमध्ये धर्मग्रंथ जाळल्यानंतर गावातील वातावरण बिघडले आहे. गावातील एकतेला बाधा पोहोचली असून पोलिसांकडून हिंदू युवकांची चौकशी सुरू आहे. तरुणांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावून मारबडव केली जात आहे. दररोज कामाला जाऊन कुटुंब चालविणाऱ्या तरुणांनाच चौकशीसाठी बोलाविले जात असल्याने पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही तरुणांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याने संतिबस्तवाड ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारवाईबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. राणी चन्नम्मा चौक येथे धरणे धरत ग्रामस्थांनी घोषणा दिल्या. यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले, कोणत्याही धर्मग्रंथाची विटंबना झाल्यास त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. यापूर्वी गावामध्ये सर्व समाज एकत्रित होते. परंतु धर्मग्रंथ जाळणे हे एक षड्यंत्र आहे. पोलिसांनी कोणाच्यातरी दबावाखाली येत कारवाई करू नये, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.
अॅड. प्रसाद सडेकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती देत काही प्रश्न उपस्थित केले. धनंजय जाधव यांनी प्रशासनाला इशारा देत चौकशी न थांबल्यास प्रशासनाला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, भाजपचे धनंजय जाधव, अॅड. प्रसाद सडेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, विश्व हिंदू परिषदेचे कृष्णा भट्ट, संतिबस्तवाड ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मी चन्नगुप्पी, रामा पाटील, विठ्ठल अंकलगी, अॅड. पवन नाईक, अजय चन्नगुप्पी, देवाप्पा नाईक, भरमा गुडुमकेरी, बसाप्पा पुरीमुद्दी, अॅड. जोतिबा पाटील, रेणुका खानापुरे, निशा जंगळी, सातुले गुरव, बाबाजी पावशे, ओमाण्णा बस्तवाडकर, महादेव बिर्जे, मधू बिर्जे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांचे आश्वासन...संतिबस्तवाड ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनाही निवेदन दिले. आपण संतिबस्तवाड गावाला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी ग्रामस्थांना दिले. या प्रकरणात निष्पाप तरुणांना गोवल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संतिबस्तवाड ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
संतिबस्तवाड ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न-
- 11 मे रोजी सीसीटीव्ही कोणत्या कारणास्तव काढून टाकला?
- 12 मे रोजी पहाटे 5 वाजता मशिदीचा दरवाजा कोणी उघडला?
- धर्मग्रंथ नसताना प्रार्थना कशी केली?
- 11 रोजी मशिदीचे मौलाना अचानक घर सोडून का गेले?
- रात्री घटना घडल्याचे सांगण्यात आले. मग सकाळपर्यंत धर्मग्रंथ कसा जळत होता?
- गावातील शांतता कमिटीशी याबाबतची वाच्यता न करता अचानक बाहेरील 2 हजार तरुण गावात आलेच कसे?