पाकिस्तानात हिंदू महिलेला उमेदवारी
डॉ. सवीरा प्रकाश यांना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे तिकीट
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तानातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पाकिस्तानच्या राजकारणात यावेळी एका हिंदू महिलेची एंट्री झाली आहे. पाकिस्तानात हिंदूधर्मीय आणि त्यातही महिलेने राजकारणात प्रवेश करणे छोटी गोष्ट नाही. या हिंदू महिलेला पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) उमेदवारी दिली आहे. पाकिस्तानच्या 16 व्या नॅशनल असेंबलीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
पाकिस्तानी-हिंदू डॉ. सवीरा प्रकाश या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बुनेर जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाच्या पहिल्या महिला उमेदवार ठरणार आहेत. सवीरा प्रकाश यांनी 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे वडिल डॉक्टर ओम प्रकाश हे अलिकडेच सेवानिवृत्त झाले असून ते मागील 35 वर्षांपासून पक्षाचे सक्रीय सदस्य होते.
सवीरा प्रकाश यांनी पीके-25 च्या बिगरराखीव मतदारसंघासाठी स्वत:चा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. सध्या सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला शाखेच्या महासचिव म्हणून कार्यरत आहेत.
वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे मानवतेची सेवा करणे माझ्या रक्तातच असल्याचे डॉ. सवीरा प्रकाश यांनी सांगितले आहे. एक लोकप्रतिनिधी होण्याचे माझे स्वप्न डॉक्टर म्हणून शासकीय रुग्णालयांमधील खराब व्यवस्थापन आणि असहाय्यतेचा अनुभव घेतल्यावर निर्माण झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.