अबुधाबीमधील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले
अबुधाबीमधील हिंदू मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मान, कोपर आणि घोट्यांवरील शरीराचा भाग झाकून ठेवावा लागेल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर टोपी, टी-शर्ट, जीन्सला परवानगी नाकारण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) अबुधाबी, येथील पहिले हिंदू मंदिर काल (शुक्रवारी) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी अबू धाबीच्या या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले होते. मंदिर व्यवस्थापनाने आपल्या वेबसाइटवर भाविक आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये ड्रेस कोडपासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीपर्यंतचे नियम समजावून सांगितले आहेत. मंदिराच्या वेबसाइटवर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टी-शर्ट, कॅप आणि घट्ट कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मान, कोपर आणि घोट्यांमधील शरीराचा भाग झाकून ठेवावा लागेल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर आक्षेपार्ह डिझाइन असलेल्या टोपी, टी-शर्ट आणि इतर कपड्यांना परवानगी नाही. जाळी किंवा सी-थ्रू आणि फिटिंग कपडे घालू नका असेही नमूद करण्यात आले आहे. पाळीव प्राण्यांनाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. याशिवाय मंदिर परिसरात बाहेरील खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच, मंदिर परिसरात ड्रोन कॅमेरे किंवा ड्रोनला सक्त मनाई आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंगळवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मंदिरे उघडी राहतील. दर सोमवारी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.