बांगलादेशात हिंदू शिक्षकांवर राजीनाम्याची सक्ती
जमावाकडून हिरावून घेतला जातोय रोजगार
वृत्तसंस्था/ ढाका
शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा आणि देश सोडल्यावर बांगलादेशात हिंदूंसमवेत अन्य अल्पसंख्याकांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. आता हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे समोर आले आहे. आतायर्पंत 49 शिक्षकांकडुन बळजबरीने राजीनामा घेण्यात आला आहे.
हल्ले आणि अत्याचाराला सामोरे गेल्यावर आता हिंदूंना शासकीय नोकऱ्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. यासब्ंांधीचा खुलासा बांगलादेश छात्र एक्य परिषदेने केला आहे. ही बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन विद्यार्थ्यांची संघटना आहे. यातील तेथील बकरगंज महाविद्यालयाच्या प्राचार्या शुक्ला रॉय यांचे राजीनामा देतानाचे छायाचित्रही समोर आले आहे. त्यांच्याकडुन एका कोऱ्या कागदावर ‘मी राजीनामा देते’ केवळ इतकेच लिहून घेत जमावाने त्यांना नोकरी सोडायला लावली आहे.
शाळेबाहेरील लोक आणि विद्यार्थी या शिक्षकांच्या कार्यालयात पोहोचून घोषणाबाजी करतात आणि त्यांच्यावर दडपण आणून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतात. संघटनेकडून 50 शिक्षकांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले तरीही प्रत्यक्षात हा आकडा त्याहून अधिक असू शकतो.
हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार हटविण्यात आल्यावर बांगलादेशातील धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याक आता हिंसेला सामोरे जात असल्याचे बांगलादेश छात्र ओइक्या परिषदेचे समन्वयक साजिब सरकार यांनी सांगितले आहे.
हिंसेत हिंदूंवर हल्ले, लूट, महिलांवर हल्ले, मंदिरांमध्ये तोडफोड, घर आणि दुकानांची जाळपोळ आणि हत्येचे प्रकार देखील सामील आहेत. देशभरात अल्पसंख्याक शिक्षकांना शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे 30 ऑगस्टपर्यंत 49 शिक्षकांना राजीनामा देणे भाग पडल्याचा दावा साजिब सरकार यांनी केला आहे.
तत्पूर्वी 8 ऑगस्ट रोजी अजीमपूर गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल आणि कॉलेजच्या सुमारे 50 विद्यार्थिनींनी प्राचार्य गीतांजली बरुआ यांना घेरले होते. बरुआ तसेच सहाय्यक मुख्याध्यापक गौतम चंद्र पॉल यांचा बळजबरीने राजीनामा घेण्यात आला होता. अशा घटनांचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. या वाढत्या बिकट स्थितीदरम्यान बांगलादेशातील हिंदू शिक्षकांदरम्यान भीती आणि असहाय्यतेची भावना स्पष्टपणे दिसून येते.
48 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले
5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनात 400 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर हसीना यांनी बांगलादेश सोडत भारतात आश्रय घेतला आहे. 5 ऑगस्टपासून देशातील 48 जिल्ह्यांमध्ये हजारो हिंदू परिवारांना हिंसा आणि क्रौर्याला तोंड द्यावे लागल्याची माहिती बांगलादेश जातीय हिंदू मोहजोतकडून सांगण्यात आले.
आवाहन ठरले निष्प्रभ
बांगलादेशात अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी शपथ घेतल्यावर हिंदूंविरोधी हिंसा रोखण्याचे आवाहन केले होते. देशातील राज्यघटना कायम राखू असे त्यांनी म्हटले होते. परंतु त्यांच्या आवाहनाचा बांगलादेशात कुठलाच प्रभाव पडताना दिसून येत नाही.
तस्लीमांकडून मुद्दा उपस्थित
विद्यार्थी आणि आंदोलकांच्या हिंसेदरम्यान अल्पसंख्याक हिंदूंचे रक्षण न करणाऱ्या सैन्यसमर्थिन मुहम्मद युनूस सरकारवर लेखिका तस्लीमा नसरीन यांनी निशाणा साधला आहे. बांगलादेशात शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात असताना युनूस याविरुद्ध शब्दही उच्चारत नसल्याची टीका नसरीन यांनी केली आहे.