ज्ञानवापीत हिंदू पूजा होतच राहणार
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय : मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
वृत्तसंस्था/ प्रयागराज
वाराणसीच्या ज्ञानवापी परिसराच्या तळघरात होत असलेले हिंदू पूजापाठ यापुढेही होत राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने यासंब्ंाधात दिलेला निर्णय उचलून धरताना उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
या संबंधात जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही सबळ कारण नाही. जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय उपलब्ध पुरावे आणि परिस्थिती यांच्या आधारावरच दिला असून तो योग्य आहे, असा स्पष्ट निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात सोमवारी दिला.
काय होता निर्णय
17 जानेवारी 2024 या दिवशी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी या प्रकरणात निर्णय दिला होता. ज्ञानवापीच्या तळघरात पूजापाठ करण्याचा हिंदूंना अधिकार आहे. या तळघरात पूर्वापारपासून अशी पूजा चालत आलेली आहे. 1992 पासून या पूजेत खंड पडला आहे. मात्र, हिंदूंचा अधिकार नाकारता येणार नाही. त्यामुळे हे तळघर वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हिंदूंसाठी मोकळे करुन द्यावे आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था द्यावी असा आदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर 31 जानेवारी 2024 या दिवशीही त्यांनी आदेश दिला होता.
मुस्लीम पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयाविरोधात या प्रकरणातील मुस्लीम पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी करीत आहे. उच्च न्यायालयाचा पूर्ण आदेश हाती आल्यानंतर यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे प्रतिपादन अंजुमान इंतझामिया मस्जीद या संस्थेने केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संस्थेने नापसंती व्यक्त केली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
मुस्लीम राजसत्तेच्या काळात वाराणसी येथे पूर्वीपासून तेथे असणारे भव्य शिवमंदिर पाडवून मशिद बांधण्यात आली होती. मशीद बांधण्याचे आणि मंदिर पाडविण्याचे काम औरंगजेबाच्या आज्ञेवरुन करण्यात आले होते. तथापि, त्यानंतरही हिंदू या परिसरात पूजापाठ करत राहिले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदूंना येथे पूजापाठ करण्यास अनुमती देण्यात आली होती. मात्र 1993 मध्ये उत्तर प्रदेशातील मुलायमसिंग यादव यांच्या सरकारने ही पूजा बंद केली होती. तथापि, आता तो अधिकार हिंदूंना पुन्हा मिळाला आहे. अर्थातच, सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अंतिम निर्णय दिल्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे.
श्रृंगार गौरी प्रकरण
व्यास तळघरातील पूजा प्रकरणाच्याही आधी पाच हिंदू महिलांनी ऑगस्ट 2021 मध्ये ज्ञानवापी परिसरातील श्रृंगारगौरी येथे पूजा करण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन वाराणसीच्या नागरी न्यायालयात केले होते. त्यानंतर नागरी न्यायालयाने या परिसराचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्यात यावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाला मुस्लीम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा सर्व परिसर सील करण्याचा आदेश दिला होता. तसेच हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केले होते. या प्रकरणी सात अभियोग सादर करण्यात आले असून आता ते सर्व एकत्र करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांवर एकाचवेळी सुनावणी केली जात आहे. सध्या या परिसरात असलेल्या मशिदीच्या स्थानी पुरातन मंदिर होते. ते पाडवून मशीद बांधली असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.