पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग यांच्यावर गोळीबार
पंजाब
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळाबाराचा प्रयत्न झाला. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारात हा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुखबीर सिंग बादल सुरक्षित आहेत. घटनास्थळावर उपस्थितांनी हल्लेखोराला वेळीच ताब्यात घेतले. नारायण सिंग असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले आहे.
सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर पहारेदाराच्या भूमिकेत सेवा देत होते. यावेळी अचानक एक व्यक्ती तेथे आला आणि त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सतर्कता दाखवून त्याला रोखले. त्यामुळे नारायण सिंग यांनी हवेत गोळीबार केला.
आरोपी खालसा दलाशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्याने गोळीबाराचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याचे मुख्य कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस चौकशी करत आहेत.